कराची : वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन जगभर तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आता या हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया समोर आली आहे. या हल्ल्यात भारतीय लोकांचाच हात आहे, आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नाकारतो असे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले.
या हल्ल्यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नाकारतो. ख्वाजा आसिफ यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले. या हल्ल्यामागे भारतातील लोकांचा हात आहे. भारतात, नागालँडपासून मणिपूर आणि काश्मीरपर्यंत, लोक सरकारच्या विरोधात आहेत, असंही ते म्हणाले.
काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी एक विधान केले होते. हे विधान आता काल झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा चर्चेत आले आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांनी काश्मीरला त्यांच्या देशाची जीवनरेखा असल्याचे वर्णन केले होते. १६ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये बोलताना ते म्हणाले होते की, ‘‘ही आमची नस होती आणि राहील. आम्ही हे विसरणार नाही. भारतीय कब्जाविरुद्धच्या लढाईत आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना एकटे सोडणार नाही, काल झालेल्या हल्ल्यानंतर आता त्यांचे हे विधान पुन्हा व्हायरल झाले आहे.