कराची : वृत्तसंस्था
पाकिस्तान गायींसोबत एक नवा प्रयोग करत आहे, भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्ये देखील गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोव-याचा उपयोग हा इंधनासाठी होतो. मात्र आता पाकिस्तान सरकारने गाईच्या शेणापासून एक ग्रीन प्रोजेक्ट सुरू केला आहे.असे करणारा पाकिस्तान हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानचे या प्रोजेक्टवर संशोधन सुरू आहे, ज्यामुळे देशातील प्रदूषण नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत होत आहे. पाकिस्तानच्या कराची शहरात धावणा-या २०० पेक्षाही अधिक बस या गायीच्या शेणापासून तयार केलेल्या इंधनावर धावत आहेत. या प्रोजेक्टला ग्रीन बस रॅपिड ट्रांजिट (बीआरटी) बस नेटवर्क असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत गायींच्या शेणापासून इंधन बनवले जाते आणि त्या इंधनावर बस धावतात.
पाकिस्तानमध्ये गायीच्या शेणापासून मिथेन वायूची निर्मिती सुरू आहे, याचा उपयोग हा वाहनांसाठी इंधन म्हणून करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये हा प्रयोग सुरू आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या पशु गणनेनुसार पाकिस्तानमध्ये चार लाखांहून अधिक गाई, म्हशींची संख्या आहे. जागतिक बँकेने केलेल्या आर्थिक सहाय्याच्या मदतीने पाकिस्तानने हा प्रकल्प सुरू केला आहे.
या प्रोजेक्टचा फायदा असा झाला की, येथील शेतक-यांना शेणामुळे चांगला दर मिळू लागला, तसेच पाकिस्तानची ऊर्जा समस्या दूर होण्यास देखील मदत झाली आहे. गायीच्या शेणाला चांगला भाव मिळत असल्यामुळे येथील शेतकरी देखील आता पशु पालनाकडे वळले असून, गायींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.