33 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeराष्ट्रीयपाकमुळे जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ; कमांडोसह बुलेट प्रूफ कार

पाकमुळे जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ; कमांडोसह बुलेट प्रूफ कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जयशंकर यांना बुलेटप्रूफ कार आणि कमांडो दिले जाणार आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर जयशंकर यांनी जगभरात मोर्चेबांधणी केली होती, यानंतर पाकिस्तानवर हवाई हल्ले केल्यानंतरही जयशंकर यांची अमेरिका, सौदीसह इतर देशांशी चर्चा करण्यात मोठी भूमिका होती. यामुळे जयशंकर यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

जयशंकर यांच्या ताफ्यात विशेष बुलेटप्रूफ वाहन वाढविण्यात येणार आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर आता बुलेटप्रूफ कारमधून प्रवास करतील, त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानाभोवतीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

जयशंकर यांच्याकडे आधीपासूनच झेड सुरक्षा होती. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. यामध्ये ३३ कमांडोंची एक टीम सतत तैनात असते. गेल्या सात महिन्यांत जयशंकर यांची सुरक्षा दुस-यांदा वाढविण्यात आली होती. ऑक्टोबर २०२४ पर्यंत त्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येत होती. दिल्ली पोलीस ही सुरक्षा देत होते. परंतू, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिल्याने दिल्ली पोलिसांकडून सीआरपीएफने जबाबदारी स्वीकारली होती.

सीआरपीएफ सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, दलाई लामा आणि काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह २१० हून अधिक लोकांना व्हीआयपी सुरक्षा प्रदान करत आहे. केंद्रीय गृहमंत्रालय वेळोवेळी या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत असते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR