नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानशी सर्व व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केली होती, परंतु आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. भाजप नेते आणि उद्योगपती निलोत्पल मृणाल यांनी तक्रार केली की, पाकिस्तानातून वस्तू अजूनही ऑनलाइन शॉपिंग साइट्सद्वारे भारतात पोहोचत आहेत. त्यांनी याला ‘कॉस्मेटिक जिहाद’ असं म्हटलं आहे. हे साहित्य धोकादायक असू शकते आणि त्याद्वारे दहशतवादाला आर्थिक पाठबळ दिले जात आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
निलोत्पल मृणाल यांनी एका ऑनलाइन साईटवरून पाकिस्तानी वस्तू ऑर्डर करून लाईव्ह डेमो दाखवला आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध बंद असले तरी काही लोक अजूनही पाकिस्तानमधून वस्तू मागवत आहेत हे त्यांनी दाखवले आहे. त्यांच्या मते, या वस्तू, विशेषत: कॉस्मेटिक उत्पादने आहेत जे अत्यंत धोकादायक असू शकतात.
मृणाल यांनी सांगितले की, ऑनलाइन शॉपिंगद्वारे पाकिस्तानला जाणारा पैसा दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्यांनी लाईव्ह डेमोमध्ये ऑर्डर प्रक्रिया दाखवली आणि भारतात माल किती सहज पोहोचत आहे हे स्पष्ट केले आहे. या डेमोनंतर, त्यांनी ऑर्डर केलेल्या वस्तू पुरावा म्हणून ठेवल्या आणि त्याबद्दल पोलिस आणि इतर तपास संस्थांकडे तक्रार केली आहे.
ऍसिडसारख्या घातक रसायनांची भीती
कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये ऍसिडसारखे हानिकारक पदार्थ मिसळले जाऊ शकतात आणि पाठवले जाऊ शकतात, ज्यामुळे लोकांचे जीवन धोक्यात येऊ शकते, अशी भीती मृणाल यांनी व्यक्त केली आहे. भारताने अलिकडेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.