रावळपिंडी : वृत्तसंस्था
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यावेळी एकमेकांवर धडाधड हल्ले चढवत आहेत. डूरंड लाईन क्रॉस करून पाकिस्तानमध्ये घुसलेले तालिबानी दहशतवादी पाकिस्तानी चौक्यांवर बॉम्बफेक करत आहेत. या दरम्यान एक बातमी समोर आली आहे की, तहरिक-ए-तालिबान (टीटीपी) ने पाकिस्तानी सैन्याच्या एका चौकीवर ताबा मिळवला आहे.
पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले आहे की, आमच्या सैन्याला तिथुन दुसरीकडे शिफ्ट केले आहे. ही प्रक्रिया फक्त बाजौर पर्यंत सीमित नव्हती तर या प्रकारे उत्तर आणि दक्षिण वजीरीस्तान मध्येही सैन्याला चौक्यांवरून हटवण्यात आले होते.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसून येते की, तालिबानींनी पाकिस्तानी चौकीवर ताबा मिळवलेला आहे. याच्या आनंदात ते बंदुकी उंचावत नाचत आहेत. त्यांनी पाकिस्तानी पोस्टवरील पाकिस्तानी झेंडा उखडून तेथे टीटीपीचा झेंडा फडकावला आहे.
अफगाणिस्तानने ड्युरंड रेषा ही ब्रिटिशांनी ठरवलेली सीमा अवैध ठरवली आहे. अफगाणिस्तानचे तालिबानी योद्धे मीर अली सीमेवर दाखल झाले आहेत. पाक हद्दीत बॉम्बगोळेही तालिबान्यांनी फेकले. पाकच्या २ लष्करी चौक्या नष्ट केल्या. तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेला पाकिस्तानात संपूर्णपणे शरियत व्यवस्था लागू करायची आहे. ही संघटना पाकिस्तानातील शाहबाज शरीफ सरकार आणि पाक लष्करालाही काफीर मानते. अफगाण हद्दीत या संघटनेचे तळ आहेत.
अफगाणिस्तानातील तालिबान आणि पाकिस्तानातील तहरिक-ए-तालिबान (टीटीपी) पाकिस्तानचे एकमेकांशी संधान आहे. अफगाण तालिबानच्या पाठबळावरच पाकिस्तानात ‘टीटीपी’चा दहशतवाद फोफावतो आहे, असा आरोप पाकिस्तानचे सरकार बराच काळ करत आलेले आहे.