इस्लामाबाद : वृत्तसंस्था
बांग्लादेश स्वतंत्र होण्यापूर्वीच बलूची लोकांची स्वातंत्र्याची मागणी आहे. सिंध आणि पंजाब प्रदेशाच्या सुपीक जमिनीवर या देशाची अर्थव्यवस्था काम करते. पण आता या प्रांतातही स्वातंत्र्याचे धुमारे फुटले आहेत. यासाठी बलूच लिबरेशन आर्मीने निकाराचा लढा सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि प्रशासन जेरीस आले आहे. दोन दिवसांपूर्वी तर थेट रेल्वेच हायजॅक करून मोठा नरसंहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाकला पुन्हा एकदा फाळणीला सामोरे जावे लागू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या अगोदर पाकिस्तानच्या जुलूमशाहीला कंटाळून बांग्लादेश स्वतंत्र झाला. तिथे तख्तापलट करण्याचे आयएसआयचे स्वप्न पूर्ण झाले. पण देशांतर्गत सुरू असलेली बंडखोरी त्यांना थोपवता आलेली नाही. सध्या पाकिस्तानचे अनेक बडे अधिकारी आणि नेते बलुचिस्तान लवकरच स्वतंत्र होईल, असे जाहीरपणे सांगत आहेत. बलूच लोकांवर पाकिस्तानी लष्कराने, प्रशासनाने गेल्या ७० वर्षात अपरिमित अत्याचार केले. अनेक बलूच नेते, तरुणांना हाल हाल करून मारले. तिथल्या स्त्रियांवरील अत्याचाराला तर सीमा नाही. त्यातूनच बलूचिस्तान लिबरेशन आर्मीचा जन्म झाला.
या लढाऊ जमातीला अत्याधुनिक शस्त्र आणि दारुगोळा मिळाल्याने त्यांनी पाकिस्तानी अधिकारी, लष्करावरील हल्ले वाढवले. मंगळवारी तर जाफर एक्स्प्रेस ही अख्खी ट्रेनच हायजॅक केली. यामध्ये प्रवाशी, आयएसआयचे अधिकारी, लष्कराचे जवान, अधिकारी यांचा समावेश होता. ही ट्रेन आणि ओलिस यांना सोडवण्यात पाक आर्मीला यश आले असले तरी या दरम्यान मोठा नरसंहार झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानमधील बलूचिस्तान आणि शेजारील इराण या देशातील दक्षिण-पूर्वेतील बलूच प्रदेश यांचा मिळून एक राष्ट्र करण्याची त्यांची जुनीच मागणी आहे.
इंग्रजाच्या काळातच मिळाले होते स्वातंत्र्य
बलूच हा अनेक वर्षांपासून स्वतंत्र प्रदेश होता. इंग्रजांच्या काळातही करारानुसार या प्रदेशाला स्वातंत्र्य बहाल करण्यात आले होते. पण भारत-पाकिस्तानच्या फाळणीवेळी टोळीवाल्यांनी आणि पाक लष्कराने या प्रदेशावर कब्जा मिळवला. भारत बलूच लोकांना मदत करण्याची भीती जिना यांना होती. त्यामुळे अगोदर हा प्रांत ताब्यात घेण्यात आला. तेव्हापासून हा संघर्ष कायम आहे.
स्वातंत्र्याची घोषणा होणार?
बलुचिस्तान आता स्वातंत्र्याच्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रदेशातील लोक केव्हाही स्वातंत्र्याची घोषणा करतील. सध्या बंडखोरांच्या ताब्यात ७ जिल्हे आहेत. पाकिस्तानी प्रशासन आणि लष्कराचे या जिल्हांमध्ये कोणतेच नियंत्रण नाही. बलूचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली तर त्यांना संयुक्त राष्ट्र संघही लागलीच मान्यता देऊ शकतो, असा दावा केला जात आहे.