नागरिकांची धावाधाव, वैद्यकीय व्हिसाधारकांना ४८ तास उरले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी देश सोडण्याची २७ एप्रिल ही शेवटची तारीख होती. केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांची व्हिसाची मुदत संपली किंवा ज्यांचा दीर्घकालीन व्हिसा मंजूर झालेला नाही, त्यांना तात्काळ भारत सोडून मायदेशात जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांची चांगलीच धावाधाव झाली असून, मिळेल त्या वाहनाने सीमा गाठण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सीमेवर गर्दी झाली आहे.
दरम्यान, वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्यासाठी २९ एप्रिलपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय कारणाशिवाय भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी आज भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी-वाघा गेटवर गर्दी केली. अनेक कुटुंबे तेथे त्यांचे सामान घेऊन रांगेत उभे असल्याचे दिसून आले. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांची संख्याही मोठी आहे. अनेक लोकांनी त्यांच्या भारतीय नातेवाईकांना भावनिक निरोप दिला.
गुरुदासपूर, अमृतसर, फिरोजपूर आणि पंजाबच्या इतर सीमावर्ती जिल्ह्यांतील अनेक पाकिस्तानी नागरिकही आज सीमेवर रवाना झाले. परवानगीशिवाय कोणीही भारतात राहू नये म्हणून अधिकारी प्रत्येक ठिकाणी कागदपत्रे तपासत आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. एकीकडे पाकिस्तानी नागरिकांनी पाकिस्तानात जाण्यासाठी सीमेवर गर्दी केली, तर दुसरीकडे पाकिस्तानातील भारतीयही मायदेशात येत आहेत. गेल्या ३ दिवसांत अटारी-वाघा बॉर्डरवरून ४५० नागरिक मायदेशात परतले तर पाकिस्तानी नागरिकांनी सीमेवर गर्दी केली आहे. ते मिळेल त्या वाहनाने मायदेशात जात आहेत.