सर्वांची ओळख पटली, मुख्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
केंद्र सरकारने काढलेल्या आदेशात जे पाकिस्तानी बसतात, त्या सर्वांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे. ते कशा प्रकारे बाहेर जात आहेत, त्या सगळ्याची नोंद ठेवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देशाबाहेर गेलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा निश्चित आकडा पोलिस विभागाकडून जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात आलेले १०८ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला दुजोरा दिला होता तर एकही पाकिस्तानी बेपत्ता नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने सरकारच्या उच्चपदस्थ लोकांमध्येही समन्वय नसल्याची बाब पुढे आली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा लागला असून त्यांची पाठवणी सुरू असल्याचे सांगितले. दीर्घ मुदतीचा व्हिसा, राजनैतिक किंवा अधिका-यांसाठी दिला जाणारा व्हिसा असणा-यांना देश सोडून जाण्याच्या आदेशातून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, अल्प मुदतीच्या व्हिसावरील सर्वाधिक १,००० पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आहेत. तसेच जवळपास ५,०५० पाकिस्तानी नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर राज्यात राहात आहेत. मुंबईतही १७ पाकिस्तानी नागरिक होते. कोणीही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता, गायब किंवा हरवलेला नाही. रविवारी किंवा सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.