इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तान अरबी समुद्रात पहिले कृत्रिम बेट बांधण्याची योजना आखत आहे. शाहबाज सरकारने अरबी समुद्रात या बेटाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. समुद्रात तेल शोधण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ म्हणून याचा वापर केला जाईल. हा प्रकल्प पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड (पीपीएल) द्वारे चालवला जाईल.
ट्रम्प यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला. जुलैमध्ये ट्रम्प यांनी घोषणा केली की, अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे पाकिस्तानच्या विशाल तेल साठ्यांचा विकास करतील. त्यांनी असेही म्हटले की, जर हे तेल सापडले तर भारत ते खरेदी करू शकेल. आता पाकिस्तान या कृत्रिम बेटाच्या मदतीने अरबी समुद्रात २५ तेल विहिरी खोदण्याची योजना आखत आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हे कृत्रिम बेट सिंधच्या किना-यापासून सुमारे ३० किमी अंतरावर, सुजावल क्षेत्राजवळ बांधले जात आहे. सुजावल कराचीपासून अंदाजे १३० किमी अंतरावर आहे. समुद्राच्या उंच लाटांपासून बचाव करण्यासाठी बेट ६ फूट उंचावले जात आहे.
अहवालानुसार, साठ्यांवरील संशोधन पूर्ण करण्यासाठी अंदाजे रु. ४२,००० कोटी खर्च येईल. त्यानंतर, समुद्राच्या खोलीतून तेल काढण्यासाठी ४-५ वर्षे लागू शकतात. जर संशोधन यशस्वी झाले, तर तेल आणि वायू काढण्यासाठी विहिरी खोदण्यासाठी आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणखी पैशांची आवश्यकता भासू शकते.

