इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराने मंगळवार दि. २४ डिसेंबर रोजी अफगाणिस्तानच्या पूर्व भागात हवाई हल्ला केला होता. यामध्ये ४६ जण ठार झाले. या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा निर्धार अफगाणिस्तानने केला आहे. १५ हजार तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानच्या दिशेने कूच केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काबुल, कंदहार आणि हेरातमधून सुमारे १५ हजार तालिबानी सैनिक खैबर पख्तूनख्वाच्या मीर अली सीमेकडे रवाना झाले आहेत.
अफगाणिस्तानवर हवाई हल्ला करणा-या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे तालिबानच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने नुकतेच वझिरीस्तानच्या माकिन भागात केलेल्या हल्ल्यात ३० पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने हवाई हल्ला केला. या हल्ल्यात ४६ जण ठार झाले असून याची गंभीर दखल तालिबान सरकारने घेतली आहे. अफगाण तालिबानकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दुर्गम भागात लपण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे एके-४७ , मोर्टार, रॉकेट लाँचर यांसारख्या आधुनिक शस्त्रांचा मोठा साठा आहे. तसेच डोंगररांगांमध्ये होणा-या हल्ल्यात हे सैनिक विशेष प्रशिक्षित आहेत. पाकिस्तानमधील शेहबाज शरीफ सरकार आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अनेक अंतर्गत मुद्द्यांमुळे सरकार आणि लष्कर दोघेही कमजोर झाले आहेत. आता तालिबानसोबतच्या संघर्षामुळे हे संकट आणखी वाढले आहे.
तालिबानची रणनीती काय?
तालिबानांनी आजवर मोठ्या लष्करी शक्तीपुढे झुकलेले नाही. रशियानंतर अमेरिकेसारख्या महासत्तेला त्यांनी वर्षानुवर्षे आव्हान दिले. तसेच अमेरिकेला अफगाणिस्तानातून परत जाण्यासही भाग पाडले. आता मीर अली सीमेवर वाढत्या हालचालींमुळे पाकिस्ताननेही आपल्या लष्कराला सतर्क केले आहे. सीमावर्ती भागात सैन्याची तैनाती वाढवण्यात आली आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या परिस्थितीमुळे मोठा संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दहशतवादी हल्ले वाढले
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेतल्यापासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. इस्लामाबादमधील सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीजच्या अहवालानुसार, २००२ च्या तुलनेत २०२३ मध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये ५६ टक्के वाढ झाली आहे. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात मागील वर्षभारत ५०० सुरक्षा कर्मचा-यांसह १,५०० नागरिक ठार झाले आहेत. तसेच इस्लामाबादने व्यापार निर्बंध लादले आहेत. तसेच व्हिसा धोरण कठोर करत पाच लाखांहून अधिक अफगाण स्थलांतरितांना पाकिस्तानमधून बाहेर काढले आहे. तेव्हापासूनही दोन्ही देशांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत.