नवी दिल्ली : भारतात घुसखोरी करून पहलगाममध्ये पर्यटकांचे प्राण घेणा-या दहशतवाद्यांवर भारताने जबरदस्त प्रहार केला. दहशतवाद्यांच्या आश्रयाची ठिकाणे असलेले तब्बल ९ ठिकाणे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केली. भारतीय लष्कराने मध्यरात्री केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय हद्दीतील गावांना लक्ष्य करत अंदाधूंद गोळीबार केला. यात तब्बल ७ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन पठारावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. भारताने पाणी, व्यापार आणि टपाल सेवा बंद केली आहे. त्यामुळे पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे. पहलगाम हल्ल्यापासूनच पाकिस्तानच्या लष्कराकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला जात आहे.
७ निष्पाप भारतीयांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मिरातील आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या गावांवर पाकिस्तानी लष्करांकडून उखळी तोफा डागण्यात आल्या. सीमेलगत असलेल्या गावांना पाकिस्तानी लष्कराने लक्ष्य केले. घरांवर गोळीबार करण्यात आला. उखळी तोफा डागण्यात आल्या. पाकिस्तानकडून अचानक करण्यात आलेल्या या गोळीबारामध्ये ७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती अधिका-यांनी दिली. जम्मूतील पुंछ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात २५ नागरिक जखमी झाले असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर
पाकिस्तानी लष्कराकडून सातत्याने भारतीय हद्दीतील चौक्यांना आणि गावांना लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे पालन करावे, असे भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला सांगण्यात आले आहे. यासंदर्भात एक लष्करी पातळीवर बैठकही झाली आहे. पण, पाकिस्तानकडून शस्त्रसंधी न पाळता गोळीबार सुरूच आहे. बुधवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले.