सातारा : प्रतिनिधी
पाचगणी परिसरात दुर्मिळ प्रजातीचे पांढरेशुभ्र सांबर आढळल्याने वन्यप्रेमी व निसर्गप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. सिडनी पॉइंटच्या पायथ्याशी असलेल्या तळेमाळ परिसरापासून काही अंतरावर हे सांबर आढळून आले आहे. यामुळे सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
हे सांबर दुर्मिळ असून, अॅल्बनो प्रजातीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान वनसंपदेचे संरक्षण होणे महत्त्वाचे असून वणव्यामध्ये वन्यजीवांसह सजीव सृष्टी होरपळत आहे. निसर्गाच्या दृष्टीने हे अत्यंत घातक आहे.
पाचगणी महाबळेश्वर परिसरातील डोंगररांगांमध्ये सुरू झालेल्या वणव्यांच्या सत्रामुळे निसर्गाच्या -हासाबरोबरच वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा आणि संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेली पाचगणी, महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे पर्यटनाबरोबरच दुर्मिळ वनौषधी तसेच वन्यजीवांमुळे प्रसिद्ध आहेत. या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर दिसून येतो. हॅरिसन फॉली येथून डोंगरद-यातून आकाशातून स्वछंद विहार करताना अनेकदा खाली वन्यप्राण्यांचा वावर दृष्टीस पडत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.