परभणी : रिक्षा पासिंग करून फिटनेस सर्टफिकेट रिन्यू करण्यासाठी उपप्रादेशिक परीवहन कार्यालय परभणी येथील मोटार वाहन निरीक्षक संतोष नंदकुमार डुकरे यांनी ५०० रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर अहिल्यानगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात खाजगी इसम मुंजा मोहिते यांना तक्रारदाराकडून ५०० रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या प्र्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असोला (ता.परभणी) कार्यालयातील मोटार परिवहन निरीक्षक (वर्ग १) संतोष नंदकुमार डुकरे (वय ४२) यांनी रिक्षा पासिंग करून फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी लाच मागितली असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांच्याकडे केली होती.
त्यानुसार करण्यात आलेल्या तपासणीत मोटर वाहन निरीक्षक डुकरे यांच्याकरिता खाजगी इसम मुंजा मोहिते याने ५०० रुपये लाचेची मागणी केली. तसेच डुकरे यांनी तक्रारदार यास खाजगी इसम मुंजा यांना भेटण्यास इशारा द्वारे सांगून त्यांचे करवी तक्रारदाराकडून अनधिकृतपणे ५०० रुपये लाच मागणी करून खाजगी इसम मुंजा मोहिते यास लाच स्वीकारण्यासाठी कोणताही प्रतिकार न करता प्रोत्साहन दिले.
त्यानुसार दि.२१ फेब्रुवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी येथे लावलेल्या सापळ्यात तक्रारदार यांच्याकडून खाजगी इसम मुंजा मोहिते याने मोटार वाहन निरीक्षक डुकरे यांच्यासाठी पंचा समक्ष ५०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या बाबत दोन्ही आरोपींविरुद्ध ताडकळस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ला.प्र.वि. अहिल्यानगर सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक श्रीमती. छाया देवरे, ला.प्र.वि.परभणी तपास अधिकारी पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर, सापळा पथक चालक पोह हरून शेख, पोकॉ. सचिन सुद्रुक, पोकॉ. गजानन गायकवाड यांनी केली.