22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरपाच वर्षांतील ११३३ रक्तजल नमुन्यांत १५२ दुषित

पाच वर्षांतील ११३३ रक्तजल नमुन्यांत १५२ दुषित

लातूर : प्रतिनिधी
मागील पाच वर्षातील लातूर जिल्ह्यातील डेंग्यू आजाराबाबतची माहिती घेतली असता असे दिसून येते की, सन २०२० मध्ये १६ संशयित रुग्णाचे रक्त्तजल नमुने घेण्यात आले, त्यामध्ये २ नमुने दुषित आढळले. २०२१ मध्ये २१७ संशयित रुग्णांचे रक्त्तजल नमुने घेण्यात आले. त्यापैकी ३९ नमुने दुषित आढळले, तर २०२२ मध्ये २३३ संशयित रुग्णांचे रक्त्तजल नमुने घेण्यात आले, त्यापैकी २७ नमुने दुषित आढळले. यापैकी एका व्यक्त्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ४६१ रक्त्तजल नमुन्यांपैकी ७५ नमुने दुषित आढळले. तसेच २०२४ मध्ये एप्रिलअखेरपर्यंत घेण्यात आलेल्या २१० नमुन्यांपैकी १५ नमुने दुषित आढळून आले आहेत. पाच वर्षांत एकुण १ हजार १३३ रक्तजल नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी १५२ नमुने दुषित निघाले.  राष्ट्रीय डेंग्यू दिन १६ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने डेंग्यूविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेण्यासाठी, नागरिकांपर्यत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हा राष्ट्रीय डेंग्यू दिन  साजरा करण्याचा उद्देश आहे.
डेंग्यू ताप हा विशिष्ट्य विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासांमुळे होतो. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी ८ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्यामुळे कोणतेही साठवलेले पाणी आठ दिवसापेक्षा जास्त ठेवू नये ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.  सध्या उन्हाळा सुरु आहे, जिल्ह्यातील ब-याच गावामध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने नागरिकांचा पाणी साठविण्याकडे कल दिसून येत आहे. अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास  अंडी घालून डासोत्पत्ती होवू शकते. या डासांची उत्पत्ती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. लोक सहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत किटकामार्फत विशेषत: डासामार्फत प्रसार होण-या हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग, जे.ई. अशा रोगाच्या नियंत्रणासाठी नियमित कार्य शासनाच्या आरोग्य विमागामार्फत करण्यात येतो. या रोगावर नियंत्रण ठेवण्याच्यादृष्टीने सर्व स्तरावरुन नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. जेणेकरुन या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल. ताप आल्यास तसेच उपरोक्त लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रक्ताची तपासणी करुन घ्यावी. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाच्या  स्तरावर डेंग्यूच्या निदानाची सोय उपलब्ध आहे. दवाखान्यात जावून आवश्यकतो उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, आरोग्य परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. अर्चना भोसले-किर्दक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, आरोग्य सेवा (हिपताप) सहाय्यक संचालक डॉ. वैशाली तांभाळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. हिंडोळे एस. एस. यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR