31.3 C
Latur
Sunday, June 16, 2024
Homeलातूरपाणीटंचाई निवारणाचे अधिकार एसडीओंना

पाणीटंचाई निवारणाचे अधिकार एसडीओंना

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या आराखडयातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पाणी टंचाईविषयक आढावा बैठकीत दिल्या. तसेच सर्व तालुक्यातील पाणी टंचाईच्या सद्यस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. तसेच या बेठकीत पुन्हा विहिर अधिग्रहण, टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय महसूल अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. प्रभारी अपर जिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पाणी टंचाईची परिस्थिती विचारात घेवून शहरी भागासोबतच गाव, वाडया-वस्त्यांवर पाणी पुरवठा करण्यासाठी विहिरी, ंिवधन विहारींचे अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, नवीन विंधन विहिरी, टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी विविध बाबींचा समावेश असलेला पाणी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तसेच या विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी उपाययोजना जलद गतीने राबविण्यासाठी या उपाययोजना मंजुरीचे अधिकार उपविभागीय महसूल अधिकारी यांना प्रदान केले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यात कोणत्याही गाव, वाडी-वस्तीवर पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास त्यादृष्टीने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा, असे जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
लातूर शहराला पाणी पुरवठा करणा-या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेवून सध्या शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. धरणातील जिवंत आणि मृत पाणीसाठयातून शहराला सप्टेंबर २०२४ पर्यंत पाणी पुरवठा केला जावू शकतो. तसेच जिल्ह्यातील पशुधनाला जूनअखेरपर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे संबंधित विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR