31.3 C
Latur
Sunday, June 16, 2024
Homeलातूरआज ग्रामीण टी-१० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 'कांटें की टक्कर'

आज ग्रामीण टी-१० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ‘कांटें की टक्कर’

लातूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपच्या तिस-या पर्वातील महाविजेता होण्यासाठी ४ संघ आज (दि.२४) शुक्रवारी उपांत्यफेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. गतविजेता रेणापूर आणि लातूर शहर संघासह अहमदपूर विरुद्ध शिरुर अनंतपाळ आणि उदगीर विरुद्ध निलंगा यांच्यातील विजयी संघात ‘काँटो की टक्कर’ अनुभवायला मिळणार आहे. अंतिम सामन्यात कोण एकमेकांशी भिडेल आणि तिस-या पर्वातील महाविजेता कोण होणार, याची क्रीडारसिकांत उत्सुकता आहे.
लातूर क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप ग्रामीण टी १० स्पर्धेत आज (दि.२३) गतविजेत्या रेणापूर संघाने चाकूर संघाला हरवत उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला आहे. आकाश आडे ५१(१८) आणि सचिन पवार ५०(२१) यांच्या अर्धशतकीय खेळीने रेणापूरने विजयाला गवसणी घातली आहे. दुस-या सामन्यात लातूर शहर संघाने लोहाविरुद्ध मोठा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यफेरीसाठी सुरु असलेल्या अहमदपूर विरुद्ध शिरुर अनंतपाळ आणि उदगीर विरुद्ध निलंगा संघांतही रोमांचक लढती सुरु आहेत.
लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपच्या पहिल्या उपांत्यफेरीसाठी झालेल्या सामन्यात गतविजेत्या रेणापूर संघाचे चाकूर संघाचा ८ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. ग्रामीण टी १० च्या मागील हंगामात तिस-या स्थानी असलेल्या चाकूर संघाने या हंगामातही चांगला खेळ केला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या चाकूर संघाने १० षटकात ९ गडी गमावत ११२ धावा केल्या. सचिन पाटील ५०(२१), तिरुपती राठोड २७ (१२) यांनी चाकूरचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नवनाथ वाकडे यांनी २ षटकात ६ धावा देत २ बळी घेऊन चाकूर संघावर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या रेणापूरने आकाश आडे ५१(१८) आणि सचिन पवार ५०(२१) यांच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. आकाश आडे सामनावीर ठरला. दुस-या उपांत्य फेरीसाठी सुरु असलेल्या सामन्यात लातूर शहर संघाने लोहा-कंधार संघाविरुद्ध शानदार खेळ करीत उपांत्य गाठली आहे.
लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप ग्रामीण टी १० स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या लोहा-कंधार संघाने पहिल्यांदा फलंदाजी करीत ८.४ षटकात सर्वबाद ६४ धावांचे माफक आव्हान लातूर शहर संघाला दिले.  लातूर शहर संघाकडून सलीम शेख यांनी हॅटट्रीक केली. त्यांनी १.४ षटके निर्धाव टाकत ४ बळी घेतले. मुहम्मद यांनी २ षटकात ३ बळी घेत सलीम शेख याला चांगली साथ दिली. सलीम शेख सामनावीर ठरला. लातूर शहर संघाने ५ गडी गमावत विजय साकार केला. लोहा-कंधार संघाने सामना गमावला असला तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करीत क्रिकेटरसिकांचे मने जिंकली.
आज उपांत्य सामन्यांच्या लढती
उपांत्य फेरीतील सामने आज (दि. २४) शुक्रवारी लातूर क्रीडा संकुल येथे पहिल्या उपांत्य सामन्यात रेणापूर संघाची गाठ उदगीर विरुद्ध निलंगा सामन्यातील विजयी संघाशी तर लातूर शहर संघाची गाठ अहमदपूर विरुद्ध शिरुर अनंतपाळ यांच्यातील विजयी संघाशी होणार आहे. शिरुर अनंतपाळ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून दोन्ही संघाच अटीतटीचा सामना सुरु आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR