बोरी : येथील रामेश्वर, सोमेश्वर महादेव मंदिर परिसरातील लिंबाच्या झाडाखाली माकडांची टोळी निवारा घेण्यासाठी बसलेली दिसून आली. दिवसेंदिवस वाढणारा उन्हाचा तडाखा फक्त माणसांनाच नव्हे, तर जंगलातील प्राण्यांनाही झळा पोहोचवत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. परिणामी पाणी व अन्नाच्या शोधात हे वन्य जीव गावांच्या दिशेने धाव घेत आहेत.
शेतांतील पारंपरिक पाणवठे कोरडे पडले आहेत. नद्या, ओढे आणि विहिरींची पातळी घसरल्याने प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. माकडांचे लहान मोठे कळप, हरणांचे समूह, ससे, रानडुक्करे, मुंगूस तसेच विविध पक्ष्यांचे थवे आता गावकुसाच्या परिसरात सहज दिसून येत आहेत. काही ठिकाणी माकडे नागरिकांच्या घराजवळील पाण विहिरींमध्ये उतरून पाणी प्याल्याचेही चित्र दिसत आहे.
कृत्रिम पाणवठ्यांची गरज
ग्रामीण भागात अनेक शेतकरी आपापल्या शेतात पाण्याचे छोटे टाके किंवा पाणवठे तयार करत असतात. मात्र यंदा उन्हाळा लवकर सुरू झाल्याने पाण्याची टंचाई आधीच जाणवू लागली आहे. अशा वेळी वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे, टाक्या, तसेच सावलीसाठी निवा-याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता ग्रामस्थांतून होत आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि युवकांनी देखील या कामात पुढाकार घ्यावा, असा सूर उमटतो आहे.