17.8 C
Latur
Wednesday, November 26, 2025
Homeलातूरपाणी, रस्ते, अस्वच्छतेच्या प्रश्नांबद्दल संताप

पाणी, रस्ते, अस्वच्छतेच्या प्रश्नांबद्दल संताप

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर नगरपंचायत निवडणूक प्रचाररास वेग आला असून कॉंग्रेस-भाजपामध्ये सरळ लढत होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवारही आपले नशीब आजमावत आहे, त्यांनीही आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे परंतु सेनेच्या ११ उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने सर्वानाच धक्का दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. नागरिकांत मात्र मूलभूत प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रेणापूर नगरपंचायतीवर मागील अनेक वर्षे भाजपाची सत्ता राहिली आहे. इतकी वर्षे सत्ता देऊनही भाजपास साध्या नागरी समस्याही सोडवता आल्या नाहीत, असा आरोप नागरिकांतून केला जात असून शहरातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा, खराब रस्ते, घरकुल योजना आणि अस्वच्छतेच्या प्रश्नांवरून भाजपा उमेदवारांना घेरले जात असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. नगरपंचायत होऊन अनेक वर्षे उलटली तरी मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पाणी, रस्ते आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या कायम आहेत. भाजप नेते निवडणुकीच्या वेळी आश्वासने देतात पण नंतर दुर्लक्ष करतात, असा नागरिकांचा आरोप आहे. रेणापूरमध्ये ९ वर्षांनंतर होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी भाजपा विकासाचे दावे करीत आहेत तर विरोधक त्यांना आव्हान देत आहेत मात्र या राजकारणात सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीमुळे रेणापूर शहरांमधील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. निधीअभावी दुरुस्ती रखडली आहे. अनियमित व स्वच्छ पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचीही वाईट अवस्था आहे. यामुळे लोकांमध्ये सत्ताधा-यांप्रति रोष आहे. निवडणुकीच्या तोंडावर दिवाळीपूर्वी शेतक-यांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यानेही नाराजी आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR