जगभरात जेव्हा जेव्हा युद्ध घडते, तेव्हा त्याची सर्वात मोठी किंमत सामान्य नागरिकांनाच चुकवावी लागते. पॅलेस्टाईनमधील गाझामध्ये सुरू असलेले युद्ध याचे ताजे उदाहरण आहे, जिथे लोकांना अन्न-पाण्यासाठी देखील वणवण भटकावे लागत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एक पोस्ट सर्वांनाच हादरवून टाकते. या पोस्टमध्ये दाखवण्यात आले आहे की भारतात फक्त ५ रुपयांना मिळणारे पार्ले-जी बिस्किट, गाझामध्ये तब्बल २३०० रुपयांना विकले जात आहे.
या व्हायरल पोस्टमध्ये पार्ले-जीच्या एका छोट्या पॅकेटचा फोटो आहे, ज्यावर हाताने लिहिले आहे ‘‘२३०० कठफ म्हणजेच सुमारे २५ डॉलर.’’ ही किंमत पाहून सगळेच थक्क झाले आहेत. मात्र ही फक्त बिस्किटाची किंमत नाही, ही त्या युद्धाची किंमत आहे, जी तिथले नागरिक आपल्या उपाशी पोटासाठी चुकवत आहेत.
गाझामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे तिथली पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सीमारेषा बंद आहेत, बाजारपेठा बंद आहेत आणि लोकांकडे ना पैसे आहेत, ना अन्न. अशा परिस्थितीत जे काही थोडंसं साहित्य पोहोचतंय, त्याची किंमत गगनाला भिडलेली आहे. पार्ले-जीसारखे साधे बिस्किट २३०० रुपयांना विकले जात असल्याचे वास्तव या संकटाचे भीषण रूप समोर आणते.
भारतामध्ये लहानग्यांची पहिली पसंती असलेले आणि प्रत्येक घरात सहजपणे मिळणारे पार्ले-जी बिस्किट आज गाझामधील युद्धाच्या भीषणतेचे प्रतीक बनले आहे. हे दर्शवते की युद्ध हे केवळ क्षेपणास्त्रांनीच लढले जात नाही, तर सामान्य माणसाच्या ताटातल्या घासावरसुद्धा त्याचा परिणाम घडवते.