मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदावरून उद्भवलेला वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. रायगड जिल्ह्यातील वाद प्रामुख्याने उफाळून आला. याठिकाणी आदिती तटकरेंना पुन्हा पालकमंत्रिपद देण्यात आल्याने एकनाथ शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले समर्थकांनी रस्त्यावरून उतरून टायर जाळले.
त्यानंतर इतर ३ आमदारांनी तटकरेंच्या नियुक्तीच्या विरोध केला. त्यानंतर तातडीने या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. आता मुख्यमंत्री महाराष्ट्रात परतल्यानंतरही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद शमला नाही.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी शिंदेंच्या आमदारांना गर्भित इशारा देत गुवाहाटीतील व्हिडिओ बाहेर काढू असे म्हटले आहे. त्यावरून शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनीही पलटवार केला. सुरज चव्हाण म्हणाले होते की, भरत गोगावले यांनी आपली उंची पाहून बोलले पाहिजे. जर आम्हाला काढायचे म्हटले तर गुवाहाटीतील हॉटेलच्या बाहेरचे नाही तर आतमधीलही व्हिडिओ काढू शकतो. हे तिघांनी लक्षात ठेवावे. एकनाथ शिंदे यांनीही या तिघांना वेळीच आवर घालावा. आम्हीही जशास तसे उत्तर देऊ. महायुती चांगले काम करत असताना दोस्तीत कुस्ती करण्याचे काम शिंदे गटातील लोकांनी करू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वेळीच लक्ष घालून योग्य तो न्याय निवाडा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
तर भरत शेठ रायगडात जन्माला आले आहे. त्यांची उंची बरीच आहे. आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे मंत्री आहेत. आमदारांचे रेकॉर्डिंग व्हिडिओ बाहेर काढू असं वक्तव्य काही करतायेत. त्यांना सांगतो, त्यांच्या पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचे व्हिडिओ बाहेर काढले तर महाराष्ट्रात काय देशात फिरताना मुश्कील होईल. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलावे. बालिशबुद्धीने बोलू नये हा आमचा त्यांना सल्ला आहे. अजून त्यांना खूप काही शिकायचे आहे. आम्ही बोलायला गेलं तर खूप काही बोलू शकतो. त्यामुळे त्यांनी सबुरीने घ्यावे असा प्रतिइशारा आमदार महेंद्र दळवी यांनी सुरज चव्हाण यांना दिला आहे.
दरम्यान, सुनील तटकरेंच्या लोकसभेला आम्ही मनापासून काम केले. त्यांच्यावरील आरोप पाहताना ते निवडून येणे शक्य नव्हते. तरीही आमच्या कार्यकार्त्यांनी प्रामाणिकपणे मदत केली. त्यांना बहुमताने निवडून दिले. मात्र भरतशेठ जे बोलले ते त्रिवार सत्य आहे.
तटकरेंनी विरोधात काम केले
महाड मतदारसंघात तटकरेंचा कार्यकर्ता त्याला शेवटच्या क्षणी फारकत घेत विरोधकांचे काम करायला लावले. महेंद्र थोरवेंविरोधात राष्ट्रवादीतील माणूस उभा केला होता. त्यांना मदत करावी म्हणून तिथल्या शेकापला परिपत्रक काढायला लावले. तटकरेंनी हे केले आहे. आमच्या तिन्ही आमदारांना कसे पराभूत करता येईल यासाठी तटकरेंनी प्रयत्न केले हे खरे आहे असा आरोपही आमदार महेंद्र दळवी यांनी केला.