मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.११) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी सुरुवातीलाच मुख्यमंत्री संतप्त झाले. पालक सचिवांच्या कामगिरीमुळे त्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. तत्काळ सर्व पालक सचिवांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन बैठका घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर उशीरा पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यत आली होती. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत नाराजीनाट्य रंगले होते. अखेर मुख्यमंत्र्यांना पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली होती. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्यासोबत पालक सचिवांची नेमणुक करण्यात आली आहे. मात्र, ११ पालकसचिव अद्यापही आपआपल्या जिल्ह्यात गेले नसल्याने मुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री संतप्त झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.