छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने आता पालेभाज्यांचे दर घसरताना दिसत आहेत. पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत परंतु शेवगा आणि अनेक फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून आला.
आठवडाभरापूर्वी १० रुपयांना मेथी, पालक, शेपू, कोथिंबिरीची एक जुडी मिळत होती. परंतु आता १० रुपयांत तीन जुड्या मिळू लागल्या. मात्र, शेवग्याच्या दरात कोणताही बदल झालेला दिसला नाही. किरकोळ बाजारात शेवगा ३५० ते ४०० रुपये किलो दराने विकला जात आहे. मागील आठवड्यातील तुलनेत आवक थोडी वाढली असून चार क्विंटल शेवगा बाजारात दाखल झाला.
इतर भाज्यांच्या दरातही काहीशी घट दिसून आली. लसणाचा दर ४० ते ५० रुपये कमी झाला. चांगल्या प्रतीच्या लसणाला ३०० ते ५०० रुपये किलो दर मिळत आहे. अद्रक ३० ते ३५ रुपये किलो दराने विक्रीस असून, मागील आठवड्यात हा दर ४० रुपये किलो होता. सिमला मिरचीचा दर २५ ते ३० रुपये किलो झाला आहे, तर पत्ताकोबी व फुलकोबी ३० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. ३० ते ३५ रुपयांना एक किलो लिंबं मिळत आहेत.
चायना लसणाची विक्री ; प्रशासनाची डोळेझाक
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भारतीय लसणाला चांगला भाव मिळत आहे. मात्र बंदी असताना देखील एपीएमसीमधील काही व्यापा-यांकडून चायनावरून लसूण आयात केला जात असून एपीएमसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. भारतीय लसूण चवीला चांगला असल्याने २५० ते ४०० रुपये प्रति किलो दराने विकला जातोय मात्र चायना लसूण आकाराने मोठा आणि दर कमी असल्याने ग्राहकांची सहज फसवणूक होत असून भारतीय लसणाच्या नावाखाली चायना लसणाची विक्री व्यापा-यांकडून करण्यात येत आहे ज्याकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत आहे.