जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यातील शेतक-यांना चातकाप्रमाणे पावसाची ओढ लागली आहे. शेतक-यांचे डोळे आभाळाकडे आहेत मात्र आभाळांना काही मायेचा पाझर फुटेनासा झाला आहे. गत एक महिन्यापासून पावसाने ओढ दिलेली आहे. त्यामुळे आता पाऊसच नसल्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके चक्क वाळू लागलेली आहेत. त्यामुळे शेतक-यांवर मोठे संकट ओढवलेले आहे .
जळकोट तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये अगोदरच डोंगराळ भाग अधिक आहे. त्यामुळे आठ दिवसांपेक्षा अधिक उघडीप पावसाने दिली तर त्याचा परिणाम उत्पादनावर होत असतो. तालुक्यातील शेतक-यांनी यावर्षी पाऊस चांगला पडेल या आशेवर दुकानामधून उधारीवर खते तसेच बियाणे आणले होते.
मे महिन्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये ओलही चांगली होती. जून महिन्याच्या सुरुवातीलाही पाऊस झाल्यामुळे काही शेतक-यांनी पेरणी करून घेतली तर काही शेतक-यांनी आणखीन मोठा पाऊस पडावा म्हणून थांबले परंतु पाऊस पडला नाही यानंतर थोड्याशा पावसावर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी केली परंतु पेरणीपासूनच शेतक-यांच्या मागे शुक्ल कास्ट लागले आहे .
पेरणी झाल्यानंतर पाऊस पडला नाही यामुळे काही शेतक-यांचे बियाणे उगवले तर काही शेतक-यांचे बियाणे उगवलेच नाही याच कारणाने ब-याच शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्यामुळे बियाणे उगवले नाही आणि ज्या शेतक-यांची बियाणे उगवले तेव्हापासून पाऊस नाही यामुळे किती दिवस पिके तग धरतील, तब्बल एक महिन्यापासून पावसाचा थेंब तालुक्यात पडला नाही. दोन-चार गावे सोडली तर बाकी तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे येथील पिके संकटात सापडली आहेत.
पाणी द्यावे म्हटले तर साठवण तलावामध्ये मुबलक पाणीसाठा नाही आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे यासोबतच या शेतक-याच्या जवळ सौर पंप आहे अशा शेतक-यांचा सौर पंप ढगाळ वातावरणात योग्य रीतीने चालत नाही अशा भयंकर संकटामध्ये शेतकरी अडकला आहे. शेतक-यांना आता काय करावे हीही सूचेनासे झाले आहे. उन्हाळ्यासारखे ऊन लागत आहे त्यामुळे झपाट्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे आता तर जमिनीला मोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. आज जरी पाऊस पडला तरीही शेतक-यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . अगदी जुलैचा शेवटचा आठवडा काही दिवसांमध्ये सुरू होतो ऑगस्ट महिन्यांमध्ये मुगाला शेंगा लागतात परंतु यावर्षी शेंगा सोडा मुगाला साधे फुलही दिसून येत नाही .
या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून शेतक-यांना कर्जमाफी मिळेल तसेच इतर काही योजना मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु ना शेतक-यांना कर्जमाफी मिळाली किंवा शेतक-यांसाठी कुठली नवीन योजना आणली. त्यामुळे डोंगराळ भागातील शेतकरी सरकारच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करत आहे. आता पाऊस पडला तरीही शेतक-यांच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट होणार आहे यामुळे जळकोट तालुक्यातील शेतक-यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत .