आशेवर जग जगते असे म्हणतात, ते काही खोटे नाही. पाऊस परतणार अशा बातम्या येत आहेत त्यामुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. यंदा राज्यात कमी पावसामुळे दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच ऑक्टोबर हिटमुळे मुंबई, पुणे, नाशिकसह राज्याला उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. आता नवरात्रीच्या उत्सवात हवामानात बदल जाणवत आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, चिपळूण, धुळे, सांगलीतील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला;
मात्र दुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह काही भागात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये काही भागासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. परभणी आणि बीड जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज आहे. हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात हवामान कोरडे, ढगाळ आणि काही ठिकाणी दमट राहण्याची शक्यता आहे. यंदा पावसाने दगा दिला हे खरे; पण शेतक-याला फसवले ते फक्त पावसाने नाही तर रोज मोबाईलवर येणा-या पक्क्या अंदाजानीही! यामुळे या बोगस ‘हवामान तज्ज्ञांना’ आवरण्याची वेळ आली आहे. हे बोगस तज्ज्ञ ‘यंदा भरपूर पाऊस आहे, लवकर पेरण्या करा’, ‘अमुक तारखेपासून राज्यभर धो-धो पाऊस’ असे संदेश व्हॉट्स अॅपवर पाठवत होते. स्वत:ला हवामानतज्ज्ञ म्हणवणा-यांचे अंदाज यंदा सपशेल फसले. सप्टेंबरअखेर त्यांनी ते मान्यही केले.
भारतीय हवामान विभाग ही काही आजकालची संस्था नाही. तिच्याकडे सव्वाशे वर्षाहून अधिक काळाच्या पावसाच्या नोंदी आहेत. तसे या बोगस हवामान तज्ज्ञांकडे काय आहे? भारतीय मान्सूनवर प्रशांत महासागरातील एल-निनो, हिंदी महासागरातील आयओडी, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिमालय आदींचा परिणाम होत असतो त्यामुळे युरोप-अमेरिकेत मिळतो तसा तंतोतंत अंदाज इथे देता येत नाही. ‘भरपूर पाऊस पडणार’ असे सांगितल्याने शेतक-यांचे काही भले होत नाही. पावसाचे प्रत्यक्ष दिवस किती असतील, हे सांगणे जास्त महत्त्वाचे असते. कारण चार दिवसांत महिनाभराचा पाऊस झाला आणि नंतर तीन आठवडे उघडीप पडली तर कागदावर सरासरी भरते; पण शेतात पीक जळून जाते. यंदा अनेक भागात असेच घडले. आता जर पाऊस बरसला तर तो रबी हंगामासाठी फायदेशीर ठरणार आहे. पाण्याची तीव्र टंचाई, जमिनीतील ओलाव्याचा अभाव आणि पिकांसमोरील संकट कायम असल्याने आता जोरदार पावसाची गरज आहे. राज्यात यंदा सरासरीहून कमी पाऊस झाला असून बहुतांश भागात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत तर बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात सक्रिय असणा-या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
यंदा मान्सूनने सरासरी तारखेच्या दोन दिवस आधी महाराष्ट्राचा निरोप घेतला. आता पुढचा हक्काचा पाऊस थेट जूनमध्येच म्हणजे आज धरणात, तलावात, विहिरीत आणि भूगर्भात जेवढे पाणी आहे तेवढ्यावरच पुढचे आठ महिने काढायचे आहेत. महाराष्ट्रात फक्त नैऋत्य मान्सूनचा पाऊस पडतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात जे पाणी पडते तेच वर्षाचे भांडवल. हे पाणी चार महिन्यात साठवायचे आणि बारा महिने पुरवायचे. ही चैन नसून गरज आहे! मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३९ टक्के कमी पाऊस झाला आहे. पाणी किती आहे, यापेक्षा ते कसे वापरतो? हा मोठा प्रश्न आहे. कालव्यातील गळती, पाटचा-यांची दुरवस्था आणि अनधिकृत उपसा यामुळे कागदावरचा हिशेब आणि शेतीपर्यंत पोहोचणारे पाणी यात मोठी तफावत आहे. प्राधान्यक्रमाने आधी माणसाचे पिण्याचे पाणी, मग जनावरे, त्यानंतर शेती आणि उद्योग असे नियोजन हवे. ऊस, केळी, द्राक्षे यासारख्या जास्त पाणी पिणा-या पिकांवर आणि साखर-इथेनॉल उद्योगाच्या पाणीवापरावर यंदा बंधने आवश्यक आहेत.
















