मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला असून, शेतक-यांच्या उत्पादन खर्चावर थेट परिणाम झाला आहे. पावसामुळे उगवलेली सोयाबीनची रोपे कुजली, काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली, तर काही भागांत किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन लक्षणीय घटेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
सोयाबीनचे उत्पादन घटणार
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. मात्र, पावसाचा अतिरेक, निच-याची अडचण आणि रोग-किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात जास्त टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्यास बाजारातील पुरवठा कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरांवर दिसून येईल.
दरवाढीची शक्यता
सध्या देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढत आहेत. सरासरी ४००० ते ४५०० भाव आहे. मात्र, आगामी काळात उत्पादन घटल्याची चिन्हे दिसल्यास दर आणखी कडाडण्याची शक्यता आहे. बाजारात सोयाबीनचे दर मागणी-पुरवठ्याच्या समीकरणावर ठरतात. उत्पादन घटल्यामुळे शेतमालाची मागणी वाढेल आणि त्यामुळे भावात झपाट्याने वाढ होऊ शकते.