खा. राऊत लिखित पुस्तक प्रकाशनप्रसंगी पवार यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी
शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यात ईडीला देण्यात आलेल्या अधिकारांबद्दल भाष्य केले. पीएमएलए कायद्यामुळे सत्तेचा गैरवापर वाढला असून, विरोधकांना संपविण्याच्या दृष्टीने ईडीच्या माध्यमातून कारवाया सुरू केल्या गेल्या. यूपीए सरकारच्या काळात हा कायदा आला. याला आपण विरोध केला. परंतु माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी याबाबत आग्रह धरला. पण सत्ता परिवर्तन होताच या माध्यमातून पहिली कारवाई त्यांच्यावरच झाली, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत, खा. साकेत गोखले, गीतकार जावेद अख्तर, प्रकाशक शरद तांदळे आदी उपस्थित होते. यावेळी पवार पुढे म्हणाले की, हे पुस्तक प्रसिद्ध होणार हे दोन दिवस वाचत आहोत, टीव्हीवर पाहात आहोत. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना पुस्तक कसे समजले माहिती नाही. पुस्तकावर आणि संजय राऊत यांच्यावर प्रचंड टीका केली गेली. कुणी सांगितले, मी बालसाहित्य वाचत नाही, कुणी आणखी काय सांगितले. अनेक माणसे बोलली. परंतु हे पुस्तक वाचल्यानंतर एकंदर सत्तेचा गैरवापर कसा होतो, याचे उत्तम लिखाण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले आहे, असे शरद पवार म्हणाले.
मला आठवते. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात होतो. चिदम्बरम सहकारी होते, कायद्यात कशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे, याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणला, तो वाचल्यानंतर मी डॉ. मनमोहन सिंगांना सांगितले की, हा प्रस्ताव अत्यंत घातक आहे. ज्याला अटक केली, त्याने स्वत: गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे, अशी तरतूद कायद्यात प्रस्तावित आहे. मी स्वत: विरोध केला, कारण उद्या राज्य बदलले तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल, हे सांगितले. पण ऐकले नाही. राज्य गेले आणि पहिली कारवाई चिदम्बरम यांच्यावर झाली. विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील, ही शंका माझ्या सारख्याला होती, ती खरी ठरली, असे पवार म्हणाले.
राऊतांनी त्यांच्या पुस्तकात यूपीए आणि एनडीएच्या काळाचा उल्लेख केला. एनडीएच्या काळात १९ जणांवर कारवाई केली, यूपीएच्या काळात ९ लोकांवर आरोपपत्र दिले. पण अटक कुणालाही केली गेली नाही. एनडीएच्या काळात काँग्रेस, टीएमसी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बिजू जनता दल, डीएमके, बसपा, समाजवादी पार्टी, टीडीपी, आप, माकप, नॅशनल कॉन्फरन्स, अण्णाद्रमुक, मनसे, टीआरएस एवढ्या पक्षांच्या नेत्यांवर चौकशी लावून केसेस केल्या. याचाच अर्थ देशातील विरोधी पक्ष उद्ध्वस्त करण्याचा निकाल या कायद्याच्या माध्यमातून घेण्यात आला, असे पवार म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत, गोखले, तांदळे यांचीही भाषणे झाली.
आता ईडी कायद्यातील
तरतूद बदलावी लागेल
मी एवढाच विचार करतो की, हे पुस्तक वाचल्यानंतर कधी महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने देशात परिवर्तन केले तर पहिले काम हे करावे लागेल की सामान्य माणूस, राजकीय पक्षांचा जो मूलभूत अधिकार आहे, तो उद्ध्वस्त करायची, जी ईडी कायद्यात तरतूद आहे, ती बदलावी लागेल, असे शरद पवार म्हणाले.
…तर मी नरकात जाईन : अख्तर
तुम्ही सर्व बाजूंनी बोलता तेव्हा अनेकांची नाराजी ओढावता. मला त्याचा अनुभव येतो. एका बाजूचे तू काफीर आहेस, नरकात जाशील, असे म्हणतात तर दुसरीकड तू जिहादी आहेस, पाकिस्तानात निघून जा, असे म्हणतात. पण पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील तर मी नरकात जाणे पसंत करेन, असे गीतकार जावेद अख्तर म्हणाले.