लातूर : प्रतिनिधी
बीड, परभणी येथील पीडित कुटूंबियांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसपक्ष सर्व पातळ्यांवर लढत राहील, अशी भुमिका राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसार माध्यमासमोर मांडली. परभणी येथे काही दिवसांपूर्वी भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी परभणी शहरातील नवा मोंढा येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सुर्यवंशी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे येऊन सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली सांत्वन केले, तत्पूर्वी या पीडित कुटुंबियांची भेट घेऊन एकूण घटनाक्रम जाणून घेतला, बीड असो की परभणी या जिल्ह्यातील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सर्व पातळयांवर लढत राहील, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली. महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारवर काँग्रेस पक्षाच्यावतीने दबाव निर्माण केला जाईल, असेही यावेळी सांगितले.