धाराशिव : प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदीचे पाणी येत्या ऑक्टोबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यात यावे, असे नियोजन करण्यात आले आहे. घाटणे बॅरेजमधून हे पाणी तुळजापूरजवळील रामदरा तलावात येईल. उर्वरित सर्व कामे येत्या २० दिवसांत पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि ठेकेदारांनी तयारी केली आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
आमदार राणाजगजितसिंह पाटील गुरुवारी (दि. १०) घाटणे ते पडसाळी (ता. मोहोळ, जि. सोलापूर), पांगरदरवाडी ते सिंदफळ (ता. तुळजापूर) येथील पंपगृह, उर्ध्वगामी नलिका आदी कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर कामांच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी घेतला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक २ अंतर्गत घाटणे बॅरेज ते रामदरा साठवण तलावापर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून प्रकल्प १०० टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. स्थापत्य व यांत्रिकीची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. विद्युत विभागाचीही जवळपास ९५ टक्के कामे झाली आहेत. ७२ किलोमीटर वीज वाहिनीपैकी केवळ ७०० मीटर बाकी असून, ते ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. ट्रान्समिशन लाईनच्या आवश्यक परवानग्या घेऊन १५ ऑक्टोबरपर्यंत चाचणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. वेळापत्रकात कोणताही विलंब होऊ नये, अशी सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना दिल्या.
घाटणे ते रामदरा : पाण्याचा प्रवास ६० किलोमीटर
घाटणे बॅरेजपासून रामदरा तलावापर्यंत ६० किलोमीटरचा पाण्याचा प्रवास होणार आहे. २७,९१६ अश्वशक्ती क्षमतेच्या पंपांद्वारे पाणी उचलून १५.४२ किलोमीटर उर्ध्वगामी नलिका आणि ३९.९४ किलोमीटर कालव्याद्वारे ते पुढे नेले जाणार आहे. पांगरदरवाडी, सिंदफळ आणि रामदरा या साठवण तलावांमध्ये पाणी उपलब्ध झाल्यानंतर दुष्काळसदृश परिस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यास मोठा आधार मिळेल, असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
टंचाईत पिण्याच्या पाण्याची सोय होणार
उजनी धरणातून भीमा-सीना जोड बोगद्याद्वारे कृष्णेचे पाणी सीना नदीत येईल. पुढे हेच घाटणे बॅरेज आणि तेथून पांगरदरवाडी, सिंदफळ ते रामदरा तलावात येणार आहे. रामदरा तलावाची २० दलघमी इतकी साठवण क्षमता आहे. तीव्र पाणीटंचाईच्या कालावधीत पिण्यासाठी त्याचा वापर करता येईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही टँकरद्वारे रामदरा तलावातून पाणीपुरवठा करणे शक्य होईल. त्यादृष्टीनेच हे नियोजन करण्यात आले आहे, असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
विलासराव देशमुख यांनी
दिली होती योजनेला मंजुरी
लातूर, धाराशिव जिल्ह्याला सातत्याने दुष्काळाशी सामना करावा लागत असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कृष्णेचे पाणी मराठवाड्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली होती. त्यासाठी बजेटही मंजूर केले होते. त्यामुळे या योजनेला गती मिळाली होती. आता या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, धाराशिव जिल्ह्याला लवकरच कृष्णेचे पाणी मिळणार असल्याने या योजनेचे श्रेय विकासरत्न विलासराव देशमुख यांना जाते.
















