पुणे : प्रतिनिधी
पुणेकरांनी वीजबिल न भरल्यास थेट वीजपुरवठा खंडित केला जातोय. महावितरण विभागाने २५ दिवसांत तब्बल २९ हजार वीजग्राहकांचे कनेक्शन तोडले आहे. शहरासह ग्रामीण भागातही ही मोहीम राबवली जात असून थकबाकी वसुलीसाठी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
महावितरण विभागाने पुणे विभागात थकबाकीदार वीजग्राहकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. गेल्या २५ दिवसांत वीजबिल न भरलेल्या तब्बल २९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या मोहिमेचा उद्देश प्रलंबित थकबाकी वसूल करणे हाच असून, घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे एकत्रितपणे तब्बल ८८ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
महावितरण विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितले की, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विभागाला दरमहा येणा-या उत्पन्नावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे थकबाकी वसुली अत्यावश्यक आहे. विभागाचे कर्मचारी वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्यावर थेट वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई करत आहेत. ग्राहकांनी वेळीच वीजबिल भरून ही कारवाई टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.