30.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रपुणेकरांनी घेतली ‘संतवाणी’ची अनुभूती

पुणेकरांनी घेतली ‘संतवाणी’ची अनुभूती

पुणे : प्रतिनिधी
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या ‘संतवाणी’ची अनुभूती पुणेकरांनी पुन्हा एकदा घेतली.निमित्त होते आषाढी एकादशीचे औचित्य साधत आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संतवाणी’ या विशेष कार्यक्रमाचे. गायकांच्या अभंग सादरीकरणाने ‘संतवाणी’ कार्यक्रम रसिकांना आत्मानंदाची अनुभूती देणारा ठरला.

भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं उपेंद्र भट, भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी, नातू विराज जोशी आणि गायक आनंद भाटे यांच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कलाकारांनी ‘संतवाणी’च्या माध्यमातून भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना जणू स्वरांजली अर्पण केली.

कलाकारांनी एकत्रितपणे ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या जयघोषात कार्यक्रमाला सुरुवात केली. श्रीनिवास जोशी यांनी ‘सुख अनुपम संतांचे’ आणि ‘आता कोठे धावे मन..’ हा संत चोखोबांचा अभंग गायला. आनंद भाटे यांनी ‘इंद्रायणी काठी…’ आणि ‘जनी धाव आता कंठ माझा सुकला…’ हा सवाई गंधर्व यांनी गायलेला अभंग प्रस्तुत केला. ‘नामाचा गजर…’ आणि ‘पंढरी निवासा सख्या पांडुरंगा…’ हा संत नामदेव यांचा अभंग गात विराज जोशी यांनी उपस्थितांची दाद मिळविली. श्रीनिवास व विराज जोशी यांनी एकत्रितपणे ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या अभंगाने भक्तीमय वातावरणाची अनुभूती दिली.

पं. भट यांनी यानंतर ‘समचरण तुझे देखिले..’ व ‘माझे माहेर पंढरी… हे अभंग प्रस्तुत केले. त्यांनी एका कानडी भजनाचे देखील सादरीकरण केले. ‘जो भजे हरी को सदा…’ या भैरवीने कार्यक्रमाचा समारोप झाला. पांडुरंग पवार (तबला), अविनाश दिघे (संवादिनी), राहुल गोळे (ऑर्गन), गंभीर महाराज (पखवाज), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली. उल्हास पवार यांनी सुंदर निरुपण करीत अभंगांचा भावार्थ उलगडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR