30.8 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeमुख्य बातम्यापुणे ‘आयईडी’ : इसिसचे दोघे अटकेत; ‘एनआयए’ची कारवाई

पुणे ‘आयईडी’ : इसिसचे दोघे अटकेत; ‘एनआयए’ची कारवाई

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलशी संबंधित दोन फरार आरोपींना अटक केली. २०२३ मध्ये पुण्यात आयइडी (स्फोटक यंत्र) तयार करणे आणि चाचणी करणे या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख अब्दुल्ला फयाज शेख उर्फ ​​डायपरवाला आणि तल्हा खान अशी झाली आहे. दोघेही जकार्ता (इंडोनेशिया) येथे लपले होते. शुक्रवारी रात्री ते भारतात परतत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ वर इमिग्रेशन ब्युरोने त्यांना थांबवले आणि ताब्यात घेतले. यानंतर, ‘एनआयए’च्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले आणि अटक केली.

पुण्यातील कोंढवा येथे अब्दुल्ला फयाज शेख याने भाड्याने घेतलेल्या घरात कएऊ बनवण्यात हे दोघे जण सहभागी होते. २०२२-२३ या कालावधीत, आरोपींनी या ठिकाणी बॉम्ब बनवणे आणि प्रशिक्षण देण्याशी संबंधित कार्यशाळेचे आयोजन केले आणि त्यात भाग घेतला. याव्यतिरिक्त, त्यांनी तयार केलेल्या ‘आयइडी’ची चाचणी घेण्यासाठी नियंत्रित स्फोट देखील केला.

तपास एजन्सीने सांगितले की, अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा खान यांच्याशिवाय या प्रकरणात मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, आकीफ नाचन आणि शाहनवाज आलम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

‘एनआयए’ने म्हटले आहे की, या आरोपींनी भारतातील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला होता. आरोपींनी ‘इसिस’च्या अजेंड्यानुसार हिंसाचार आणि दहशतवादाच्या माध्यमातून देशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यासाठी भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR