नाशिक : प्रतिनिधी
भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या ५० फूट खोल विहिरीत कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना पुणे-इंदूर महामार्गावर मनमाडच्या कुंदलगाव शिवारात घडली आहे. या अपघातात चालक आर. मुगम आणि क्लिनर सतीश कुमार यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मालेगाव येथून पुण्याकडून तामिळनाडूकडे जात असताना पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक थेट विहिरीत कोसळला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ट्रक विहिरीतून बाहेर काढला आहे. हा अपघात पाहून नागरिकांना ‘पुष्पा’ चित्रपटातील अपघाताची आठवण झाली. मनमाड शहरातून जाणा-या इंदूर-पुणे महामार्गावर मनमाड शहरानजीक असलेल्या कुंदलगाव शिवारात ट्रक विहिरीत कोसळला आहे.