पुणे : प्रतिनिधी
भाजपच्या महिला पदाधिका-यांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्या दवाखान्याची तोडफोड करत दोन दिवसांपूर्वी राडा केला. याबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. रूग्णालयाचा किती दोष आहे, याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात केलेल्या वर्तनाबद्दल सामान्यांत प्रचंड रोष आहे. त्यामुळे शहराध्यक्षांनी पदाधिका-यांना समज द्यावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून केली आहे.
मात्र, हे पत्र माझ्याकडे आले नाही. माध्यमांमधून मला पत्राबद्दल माहिती मिळाली आहे. तसेच, पदाधिका-यांबद्दल काही मते असतील, तर याची माहिती माध्यमांकडून मिळणे, हे फार चुकीचे आहे. महिला मोर्चाने केलेले आंदोलन स्वाभाविक होते, त्यात काही गैर नाही,’’ असे म्हणत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महिला पदाधिका-यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे पुणे शहर भाजपमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.
कुठल्यातरी सोम्यागोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काही संबंध नसताना केलेले हे मोडतोडीचे व उर्मट कृत्य आहे.
सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजेत. हे समजावून सांगण्याचे कार्य पुणे शहराध्यक्ष या नात्याने आपण कराल व महिला मोर्चा पदाधिर्कायांना समज देऊन त्यांना आपल्या पदाचा समजदारपणे वापर करण्यास सांगाल अशी आशा करते.
गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी, तिच्या दोन अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबीयांविषयी मी व्यक्त करते. कोणावरही असा प्रसंग येऊ नये. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने सविस्तर खुलासा केलेला आहे.
अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती, उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन निघून गेल्याचे स्पष्टीकरणात म्हटले आहे. अनेक वैद्यकीय सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याशी धोका पत्करून कुटुंबीयांकडून निर्णय घेण्यात आले, असे अनेक तपशील खुलाशात दिले आहेत. त्याची शहानिशा करून चूक घडली असल्यास वरिष्ठांनी योग्य ती कायदेशीर कार्यवाही अपेक्षित आहे.
पक्षाची प्रतिमा, व्यक्तीची राजकीय प्रतिमा या सर्व गोष्टी बनवण्यासाठी वेळ लागतो. परंतु अशा गोष्टींमुळे प्रतिमा डागळली जाते व त्याचा परिणाम सर्वानाच भोगावा लागतो. शिवाय वडाचे तेल वांग्यावर काढल्यामुळे विनाकारण एखाद्या व्यक्तीचे व एखाद्या समूहाचे किंवा विशिष्ट समाजाचेही कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. राजकीय व्यक्तींनी त्यामुळे कायम कृतीला विचारांची जोड देऊन कार्य करणे आवश्यक असते, असेही मला वाटते.
माध्यमांतून पत्राची माहिती मिळाली : धीरज घाटे
एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना धीरज घाटे म्हणाले, असे कोणतेही पत्र मेधा कुलकर्णी यांनी मला दिले नाही. माध्यमांतून पत्राची माहिती मला मिळाली. पण, याविषयावर प्रत्यक्ष कुलकर्णी यांच्याशी कोणतेही बोलणे झाले नाही किंवा त्यांनी मला पत्र दिले नाही. आंदोलन होऊन चार दिवस झाले. घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पुन्हा याविषयावर बोलणे योग्य होणार नाही. भाजपच्या वर्धापनदिनानिमित्त आम्ही सगळेच कार्यालयात होतो. तिथेही माझे कुलकर्णी यांच्याशी बोलणे झाले नाही.
कार्यकर्ते किंवा पदाधिका-यांसदर्भात काही मत असेल, तर माध्यमांकडून येणे चुकीचे आहे. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या प्रशासनाची मी चर्चा केली आहे. रूग्णालयाची बाजू मी ऐकून घेतली आहे. महिलेचा मृत्यू झाल्यावर महिला मोर्चाने आंदोलन करणे स्वाभाविक होते, यात काहीही गैर नाही, असे म्हणत घाटे यांनी महिला पदाधिका-यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे पुणे भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.