पुणे : प्रतिनिधी
कोकणातील समुद्रकिना-यांवर पर्यटक नेहमीच गर्दी करत असतात. याच पर्यटकांना समुद्रात उतरण्याचा मोह आवरत नाही. अशाच प्रकारे पुण्यातील काही पर्यटक मालवणमध्ये फिरण्यासाठी आले होते. हे पर्यटक सकाळच्या सुमारास तारकर्ली समुद्रात गेले. एकूण पाच पर्यटकांपैकी तीन पर्यटक समुद्रात बुडाले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
दोन्ही पर्यटकांचे मृतदेह स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले आहेत. हे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हे पर्यटक पुण्यातून पर्यटनासाठी कोकणात आले होते. या पर्यटकांना समुद्रात खोलवर न जाण्याचा सल्ला स्थानिकांनी दिला होता मात्र, स्थानिकांनी दिलेल्या सल्ल्याकडे या पर्यटकांनी दुर्लक्ष केले आणि त्यानंतर त्यांनी समुद्रात प्रवेश केला. मात्र, समुद्रात उतरल्यावर काही वेळातच ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील काही पर्यटक हे मालवणमधील तारकर्ली समुद्रकिना-यावर शनिवारी (२२ फेब्रुवारी) दाखल झाले. या पर्यटकांना समुद्रात जाण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी समुद्रात जाण्याचा निर्णय घेतला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक समुद्रात उतरले होते मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी तिघे जण बुडाले. या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
एकूण पाच जणांचा ग्रुप समुद्रात उतरला होता. त्यापैकी तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे तर एका पर्यटकाला वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक नागरिकांनी समुद्रात उडी घेत या पर्यटकाला वाचवले. तर इतर दोन पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
ज्या पर्यटकाला स्थानिकांनी वाचवले आहे त्याचे नाव ओंकार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर मृतकांची नावे शुभम आणि रोहित अशी असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही पुण्यातील हडपसर परिसरातील निवासी असल्याची माहिती आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.