पुणे : बावधन, भुसारी कॉलनी आणि भूगाव परिसरात गेल्या काही दिवसांत अतिसार, पोटदुखी व उलटी अशा तक्रारींमुळे अचानक खूप नागरिक आजारी पडल्याचे पहायला मिळत आहे. पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने रुग्ण वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याने महापालिकेच्या आरोग्य पथकाने तातडीने मंगळवारी पाहणी केली. पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित भागात सर्वेक्षण सुरू केले असून तातडीच्या वैद्यकीय प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात आहेत. परिसरात मोबाईल क्लिनिक नेमण्यात आले असून नागरिकांना आवश्यक ती औषधे दिली जात आहेत. ‘मेडिक्लोर-एम’ या गोळ्यांचे वाटप करून पाणी निर्जंतुकीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, परिसरातील खासगी दवाखाने व महापालिकेच्या बा रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. बावधन परिसर नव्याने समाविष्ट झालेल्या भागांपैकी एक असल्याने पाणीपुरवठ्याची यंत्रणा पूर्णपणे सुधारलेली नाही. त्यातूनच दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अधिक तपास सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे. पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकून निर्जंतुकीकरण करावे. लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या महापालिकेच्या दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करून घ्यावेत.