पुणे : नगर रस्त्यावरील चंदननगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत बुधवारी (दि. २३) पहाटे आग लागल्याची घटना घडली. आगीची चाहुल लागताच रहिवासी बाहेर पळाल्याने मोठा अनर्थ टळला. आग लागल्यानंतर १० गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घबराट उडाली. आगीत ९० पेक्षा जास्त झोपड्या जळाल्या असल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिका-यांनी दिली.
वसाहतीतील रस्त्यावर लावलेल्या चार ते पाच दुचाकीही जळाल्या. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
चंदननगर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत आहे. या वसाहतीत कष्टकरी मोठ्या संख्येने राहायला आहेत.
बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वसाहतीतील झोपड्यांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षाला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १५ बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्यानंतर वसाहतीतील नागरिक बाहेर पळाल्याने गंभीर दुर्घटना टळली. झोपड्यांमधील दहा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. स्फोटाच्या आवाजामुळे घबराट उडाली.