28.8 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात धुव्वादार; होर्डिंग कोसळले

पुण्यात धुव्वादार; होर्डिंग कोसळले

पुणे : मुंबई, पुणे, कोकणासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून वादळी वा-यासह वीजांचा कडकडाटही पाहायला मिळत आहे. पुण्यात सलग दुस-या दिवशी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली असून मध्यवर्ती भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे ही हार्डिंग कोसळल्याची घटना घडली असून ७-८ दुचाकी या होर्डिंग्जखाली अडकल्याची माहिती आहे. सुदैवाने कुणीही जखमी झालं नसल्याचेही समजते.

सकाळपासूनच आज पुण्यात अंशत: ढगाळ वातावरण दिसून आलं, त्यामुळे वरुण राजाची कृपावृष्टी होणार असा अंदाज लावला जात होता. त्यातच, हवामान विभागाने देखील पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, पुण्यातील विमानतळ परिसरात मुसळधार पाऊस सुरु झाला. विमानतळ्याच्या नव्या टर्मिनलवर पुन्हा एकदा पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. येथील ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत होतं. अचानक पाऊस आल्याने आणि टर्मिनलवर पाणी साचल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे वादळी वा-याने वातावरण बदलून गेलंय. पुण्यात मुसळधार पावसात भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली ७ ते ८ दुचाकी अडकल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे ही हार्डिंग कोसळल्याची घटना घडली.

जालन्यात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस
जालना जिल्ह्यात सलग मागील पाच दिवसापासून अवकाळी पाऊस बरसतो आहे. आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वादळी वा-यासह अवकाळी पाऊस पडत आहे. जालना राजुर रोडवरील एका मंगल कार्यालयातील लग्नाचा मंडप देखील या वादळी वा-यामुळे कोसळला आहे.

सोलापुरात पाऊस
सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा,पंढरपूर या भागात पूर्व मोसमी पावसाला जोरदार सुरुवात झालीय. हंगामातील पहिला जोराचा पाऊस आज झालाय. या पावसान शेतातून पाणी वाहिलंय. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळालाय.

तळकोकणात मुसळधार वळवीचा पाऊस
तळकोकणातही पावसाच्या सरी कोसळत असून कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहत असून जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच भागात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे.

गुहागरमध्ये जोरदार पाऊस
मागील अर्ध्या तासापासून गुहागर मधील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर तालुक्यातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

जामनेरमध्ये वीज कोसळून ४ म्हशी ठार
वीज कोसळून चार म्हशी जागीच ठार झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात सुनासगाव येथे घडली आहे. या घटनेने गावातील शेतकरी गोपाल इंधाते यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील सदस्याप्रमाणे जीव लाऊन सांभाळलेल्या म्हशी वीज कोसळून दगावल्याने या परिवाराच्या उदर निर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR