पुणे : प्रतिनिधी-
आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत? या विषयावर सर्व स्तरांतील नागरिकांसाठी खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन भांडारकर संस्था आणि कौशलम न्यास यांच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि या उपक्रमाच्या प्रमुख लीना मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
भारताच्या विकासाची चर्चा सर्व जगभर सुरू आहे. विकसित राष्ट्र होण्याकडे देशाचा प्रवास सुरू असताना आपला देश आदर्श आणि समर्थ देखील झाला पाहिजे हे भारतीयांच्या प्रयत्नाशिवाय होऊ शकत नाही. त्यादृष्टीने २०४७ पर्यंतच्या वाटचालीचे नियोजन, संकल्प व खास करून आपले निकष काय असतील, याची चर्चा सुरू झाली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असतानाचे चित्रण कोणत्या निकषातून करणार आहोत याचे मंथन या निबंध स्पर्धेमधून दिसावे अशी भावना आहे.
मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू आणि कोकणी अशा ५ भाषांमध्ये होत असलेल्या या निबंध स्पर्धेसाठी सर्वसामान्य नागरिकांनी तीन हजार शब्दांत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दोन हजार पाचशे शब्दांत आणि शालेय विद्यार्थ्यांनी बाराशे शब्दांत निबंध लिहायचा आहे.
या स्पर्धेकरिता दि. १५ मे पर्यंत फेसबुक ग्रुपच्या या लिंकवर https://www.facebook.com/groups/511254721726919 जाऊन नि:शुल्क नोंदणी करता येणार आहे. निबंध ३१ जुलैपर्यंत सादर करायचा आहे. निबंध डिजिटल पध्दतीने सादर करावयाचा असून यासंबंधीची विस्तृत नियमावली नोंदणी झाल्यानंतर संबंधितांना मिळणार आहे. विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार असून निवडक निबंधांचे पुस्तक प्रसिध्द केले जाणार आहे, असे सांगण्यात आले.