पुणे : पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर बनावट चलनाचा व्यापार करणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, या टोळीचा बनावट नोटांचा मोठा होलसेल व्यवसाय असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी १ लाख रुपयांच्या मूळ नोटांच्या बदल्यात २ लाखांच्या बनावट नोटा विक्री करत होते.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून नोट छपाईसाठी वापरल्या जाणा-या प्रिंटर, शाई, कोरे कागद तसेच २८ लाख ६६ हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि २ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. या रॅकेटचे धागेदोरे परराज्यातही पसरले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे मनीषा ठाणेकर (वय ३५, रा. येरवडा), सचिन यमगर (३५, रा. गहुंजे), नरेश शेट्टी (४२, रा. लोहगाव), भारती गावंड (३४) आणि प्रभू गुगलजेड्डी (३८, रा. चिंचवड) अशी आहेत. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना १७ एप्रिल रोजी पुण्यातील एका बँकेत दोनशे रुपयांच्या बनावट नोटा जमा झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेच्या तपासातून आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. चौकशीत मनीषा ठाणेकर हिचे नाव समोर आले आणि पुढे एकामागून एक धागे पकडत संपूर्ण रॅकेट उघडकीस आले.