24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात मद्यधुंद टेम्पोचालकाने उडविली ५ ते ६ वाहने; मनसे पदाधिकारी गंभीर तर पत्नीचा मृत्यू

पुण्यात मद्यधुंद टेम्पोचालकाने उडविली ५ ते ६ वाहने; मनसे पदाधिकारी गंभीर तर पत्नीचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी
कर्वे रोडवरील करिश्मा चौक ते पौड फाटा दरम्यान दारुच्या नशेत एका टेम्पोचालकाने ५ ते ६ वाहनांना धडक दिली. त्यात एका दुचाकीवरील महिलेचा मृत्यु झाला आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मनसे कार्यकर्ते श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी गीताजंली श्रीकांत अमराळे (वय ३५, रा. शास्त्री नगर)असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी टेम्पोचालक आशिष अनंत पवार (वय २६, रा. गणपती माथा, वारजे) याला अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कर्वे रोडवरील करिश्मा चौकाकडून पौड फाट्याकडे एक टेम्पो भरधाव वेगाने येत होता. त्याने करिश्मा चौकाजवळ एका वाहनाला धडक दिली. त्यावेळी तेथील बाल तरुण मंडळाची आरती सुरु होती. तेथे जमलेल्यांच्या शेजारुन तो वेगाने पुढे गेला. पुढे त्याने सिग्नलला एक रिक्षा, चारचाकी आय टेन, दोन ते तीन दुचाकी वाहनांना धडक दिली. त्यात दुचाकीवरील काही जण जखमी झाले.

त्याचवेळी पौड फाटा चौकात पौड रोड वरुन कर्वेरोडला श्रीकांत अमराळे हे वळत होते. त्यावेळी टेम्पोने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. त्यात गीतांजली अमराळे या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताचा आवाज ऐकताच तेथील एरंडवणा मित्र मंडळ, बाल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळाचे कार्यकर्ते धावून आले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वी गीतांजली अमराळे यांचा मृत्यु झाला.

श्रीकांत अमराळे हे मनसेचे कार्यकर्ते आहेत. शास्त्री नगरमधील संगम मित्र मंडळाचे ते पदाधिकारीही आहेत. मंडळाची आरती झाल्यानंतर गौरीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी ते पत्नीबरोबर जात असताना हा अपघात झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR