पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईला जाणा-या बस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे -मुंबई हायवेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आहे, त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळेच बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पुणे मुंबई महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आहे, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या 20 तासांपासून पुणे-मुंबई महामार्गावर 30 किलोमीटरपर्यंत वाहतुकीच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशी अकडून पडले आहेत. एसटी महामंडळाच्या अनेक बसेसही यात अडकून पडल्या आहेत. त्यामुळे आता इतर बस रद्द करण्याचा निर्णय परिवहन महामंडळाकडून घेण्यात आला आहे.
शेकडो वाहने वाहतूक कोंडीत अडकली
पुणे मुंबई महामार्गावर शेकडो वाहने अडकून पडली आहेत. मुंबईकडे जाणारी एक लेन आणि पुण्याकडे जाणा-या दोन लेन अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. तसेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा आणि सोबत पाणी आणि पुरेसे अन्न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण पर्यायी मार्गावरही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
अद्यापही गॅस टँकरमधून गॅस लिकेज सुरू
दरम्यान, अद्यापही गॅस टँकरमधून गॅस लिकेज सुरूच आहे. टँकरमधील गॅस दुस-या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अपघातग्रस्त टँकर बाजूला करता येणार असून, त्यानंतरच पुणेझ्रमुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होणार आहे. मात्र, यासाठी नेमका किती वेळ लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वाहनचालकांनी पुणेझ्रमुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी पुन्हा एकदा केले आहे.

