22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसंपादकीय विशेषपुतळा दुर्घटना : बुडत्याचा पाय आणखी खोलात!

पुतळा दुर्घटना : बुडत्याचा पाय आणखी खोलात!

बदलापूर येथे चार वर्षांच्या चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे मागच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. गुन्हा नोंदवण्यात पोलिसांनी केलेली टाळाटाळ, शाळेच्या व्यवस्थापनाने केलेला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक नेत्याने केलेली मुजोर भाषा, यामुळे लोकांमध्ये रोष होता. लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुशेगात असलेल्या सरकारला बदलापूरच्या घटनेमुळे जमिनीवर आणले. लोकक्षोभाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी लागली. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे विरोधकांना ‘महाराष्ट्र बंद’ मागे घ्यावा लागला. हे प्रकरण शांत होत नाही तोवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेमुळे सरकार अडचणीत आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कमपणे उभे असताना, आठ महिन्यांपूर्वी उभारलेला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी घाईघाईने पुतळा उभारण्यात आला, शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याने पुतळा कोसळला, एवढा मोठा पुतळा उभारण्याचा अनुभव नसलेल्या एका नवख्या शिल्पकाराला वशिल्याने काम दिले गेले, असे आरोप करत विरोधकांनी रान उठवले आहे. या घटनेचे समर्थन केल्यास अजून गाळात जाऊ याची जाणीव झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांची व महाराष्ट्राची माफी मागितली. पण लोक माफ करतील का? हा प्रश्न आहेच. लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सत्ताधारी महायुती सावरते आहे असे वाटत असतानाच पाठोपाठच्या या दोन घटनांनी महायुतीला मोठा धक्का बसला आहे. बाहेरची आव्हानं वाढत असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बदललेली चाल, भाजप-सेनेच्या नेत्यांशी सतत उडणारे खटके यामुळे महायुतीतला अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत.

यामुळे राज्यातले राजकीय वातावरणही झपाट्याने बदलत चालले असून ही घसरण थांबवण्याचे मोठे आव्हान महायुतीच्या नेत्यांपुढे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिन साजरा करण्यात आला होता. त्या निमित्ताने मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांनी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. परंतु केवळ आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने खळबळ उडाली. संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होतोय. ताशी ४५ किलोमीटर वेगाने वारा वाहत होता, त्यामुळे पुतळा पडल्याचे सांगत सरकारकडून सुरुवातीला सारवासारव करण्यात आली. पण आपला हा दावा हास्यास्पद असल्याचे बहुधा त्यांच्याच लक्षात आले असल्याने नंतर ते कारण सांगण्याचे टाळले. पुतळा का पडला याचा शोध घेण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. यथावकाश या समितीचा अहवाल येईल, पण शिवरायांचे व अन्य महापुरुषांचे अनेक पुतळे, स्मारके वर्षानुवर्षे भक्कमपणे उभे असताना हा पुतळा नेमका अवघ्या आठ महिन्यांत कोसळला यावरूनच निकृष्ट कामामुळेच पुतळा कोसळला हे स्पष्ट होते. पुतळा उभारणीच्या कामात झालेल्या अक्षम्य चुका व हलगर्जीपणा, त्यामागचे स्वार्थी हेतू याबाबतच्या ब-याच गोष्टी आता पुढे येत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यासाठी अत्यंत घाईघाईने हा पुतळा उभारण्यात आला होता, असा आरोप आहे. सर्वसाधारणपणे पुतळ्याच्या आराखडा करून त्याच्या प्रत्यक्ष उभारणीस किमान दोन ते अडीच वर्षे लागतात. मात्र राजकोट किल्ल्यावरचा हा पुतळा अतिशय घाईघाईत केवळ सहा महिन्यांत उभारण्यात आला होता. महाराष्ट्रात अनेक नामवंत व जगविख्यात शिल्पकार असताना पुतळ्याचे काम ठाण्यातील जयदीप आपटे या नवख्या शिल्पकाराला देण्यात आले होते. दोन, तीन फुटांच्या मूर्ती बनवणा-या या आपटेने तोवर कधीही मोठा पुतळा उभारलेला नव्हता. स्वत: आपटेने एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत आपण आजवर कधीही मोठ्या पुतळ्याचे काम केलेले नव्हते त्यामुळे हे आपल्यासाठी एक आव्हान होते असे सांगितले आहे. तरीही त्याला हे काम कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आले होते हे गूढ आहे. महापुरुषांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी कला संचालनालयाची परवानगी घ्यावी लागते.

संचालनालयाला या प्रस्तावित पुतळ्याचे क्ले मॉडेल सादर करणे गरजेचे असते. पुतळ्याला परवानगी देण्यापूर्वी तज्ज्ञ, इतिहासतज्ज्ञ आणि कलाकार या पुतळ्याचे परीक्षण करतात. या पुतळ्यासाठी अशी परवानगी घेताना पुतळा सहा फुटांचा असेल असे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात ३५ फुटी पुतळा उभारण्यात आला. कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनीच याची पोलखोल केली आहे. पुतळ्याची उंची ३५ फुटांपर्यंत नेण्याची कोणतीही कल्पना आपल्याला दिली नसल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. तसेच या बांधकामात स्टेनलेस स्टील वापरले जाणार असल्याची माहितीही आपल्याला दिली गेली नाही, असे राजीव मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. समुद्रकिनारी पुतळा उभारताना तेथील खारी हवा, वा-याचा वेग, वादळाची शक्यता या सर्व बाबींचा विचार करूनच पुतळ्याची उभारणी करणे आवश्यक होते. पण तसे केले गेले नाही. हा आपटे दुर्घटनेपासून फरार आहे.

बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला अटक करण्यात आली आहे. पण त्याने पुतळ्याच्या कामाशी माझा काहीही संबंध नसून मी फक्त चुबत-याचं डिझाईन दिलं होतं, असा दावा केला आहे. पुतळ्याचे वजन ११ टन असेल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मी त्याचं डिझाईन बनवलं होतं. माझा मुख्य पुतळ्याशी संबंध नाही, असे त्याचे म्हणणे आहे. सुप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांनी नुकताच मध्य प्रदेशात शंकराचार्यांचा १०८ फुटी पुतळा साकारला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार १५ फुटांपेक्षा अधिक उंचीचा पुतळा उभारण्यात शिल्पकाराबरोबरच इंजिनीअरचे काम खूप महत्त्वाचे असते. उंच पुतळा उभारताना जमिनीचा सर्व्हे केला जातो. जमिनीत मुरूम किती, खडक किती याचा विचार होतो. भूकंप झाला तर पुतळ्यावर त्याचा परिणाम होऊ नये, याचा विचार केला जातो.

भूगर्भामध्ये खडक किती, पाणी किती, हे सर्टिफाय केल्यावरच काम केले जाते. समुद्र किना-यावर पुतळा उभारताना वा-याच्या वेगाचा विचार कसा काय केला गेला नाही याबद्दल रामपुरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. शंकराचार्यांचा पुतळा करताना ५०० वर्षे पुतळ्याला काहीही होणार नाही याची शाश्वती मागण्यात आली होती व तज्ज्ञांनी त्याला ७०० वर्षं काही होणार नाही, असे प्रमाणपत्र दिल्यानंतरच काम सुरू करण्यात आल्याचे रामपुरे यांनी सांगितले. याचाच अर्थ महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारताना कमालीचा निष्काळजीपणा दाखवला गेलाय हेच सिद्ध होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजकोटवरील तो पुतळा उभारण्यात आला तेव्हाच आक्षेप घेतले होते. हा पुतळा खूप घाईगडबडीत उभा केला होता. तसेच हा पुतळा आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून बनवला नव्हता. त्यामुळे आम्ही हा पुतळा बदलण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगताना, संभाजीराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला यासंदर्भात पाठवलेल्या पत्राचा फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

पंतप्रधानांचा माफीनामा !
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रात असलेल्या संतप्त भावनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही घ्यावी लागली. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्रामध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल महाराष्ट्राची, शिवरायांची माफी मागितली. शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. २०१४ साली पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून आपली निवड झाली तेव्हा सर्वप्रथम मी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. माझ्यासाठी आणि माझ्या सहका-यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर आराध्य दैवत आहेत. सिंधुदुर्गात जे काही घडलं त्याबद्दल आज मस्तक झुकवून मी माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील जनक्षोभ शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी काँग्रेसकडून सातत्याने स्वा. सावरकरांचा अवमान केला जातो व त्याची खंतही कोणाला वाटत नाही, अशी टीका करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. खरंतर छत्रपती शिवरायांची स्वा. सावरकरांशी तुलना करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. त्यामुळे पुतळा उभरणीमागेही राजकारण आणि पुतळा कोसळल्यावर माफी मागतानाही राजकारण अशी टीका होतेय. अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच माफी मागितली होती. लोक माफ करतात की नाही हे दोन महिन्यांनी दिसेलच.

२०१४ साली ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ ही भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराची टॅगलाईन होती. महाराष्ट्राने मोदींना साथ दिली. पण केंद्राने छत्रपतींच्या महाराष्ट्राला नंतरच्या काळात किती साथ दिली याबाबत शंकाच आहे. छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभे करण्याची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. परंतु आजही त्याबाबत कुठलीही प्रगती झालेली नाही. या स्वप्नासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर तर हा विषयच विस्मृतीत गेला आहे. त्याचाही जाब लोक पुढच्या काळात विचारतील. त्याबद्दलही माफी मागितली जाणार का? हे बघावे लागेल.

विरोधकांचे जोडे मारो आंदोलन !
पुतळा दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने रविवारी ‘जोडे मारो आंदोलन’ केले. या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते सहभागी झाले होते पंतप्रधान राज्यात आले तेव्हा त्यांनी माफी मागितली. पण नेमकं कशाकशाची ते माफी मागणार? शिवरायांचा पुतळा पडला म्हणून, की पुतळ्यात भ्रष्टाचार झाला म्हणून? हात लावेन तिथे सत्यानाश हीच त्यांची गॅरेंटी आहे. घाईघाईने बांधलेल्या राम मंदिराला गळती लागली, दिल्ली विमानतळ गळतेय, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. तर शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांना प्रेरणा देत असतात. परंतु मालवणमध्ये उभा केलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना होता. छत्रपती महाराजांचा पुतळा पडणे म्हणजे देशातील शिवप्रेमींचा अपमान असल्याची टीका शरद पवारांनी केली. एकूण हे प्रकरण महायुती सरकारला जड जाणार असे दिसतेय.

-अभय देशपांडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR