20.5 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeसंपादकीयपुन्हा ट्रम्प सरकार!

पुन्हा ट्रम्प सरकार!

संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वर्षांनंतर पुन्हा एकदा बाजी मारली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी कडवी लढत दिली, मात्र त्या पराभूत झाल्या. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष होणा-या ट्रम्प यांनी देशाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन देशवासीयांना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी ट्रम्प यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी लागणारी २७० इलेक्टोरल मते ट्रम्प यांना मिळाली तर कमला हॅरिस यांना २२४ मते मिळाली.

आपल्याकडे अमेरिकन समाज अतिशय आधुनिक विचारांचा, लोकशाहीवादी आणि पुढारलेला आहे असे मानले जाते. अथवा तसा समज आहे. मात्र, जगातील सर्वांत जुनी लोकशाही असणा-या या देशात आतापर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्ष झाली नव्हती. त्यादृष्टीने ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार असा कयास बांधला जात होता, पण तसे झाले नाही. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी प्रेसिडेन्शिअल डिबेट घेण्याची खूप जुनी परंपरा आहे. या परंपरेची सुरुवात १९८७ मध्ये झाली. त्यावेळी नॅशनल डिबेट कमिशन नामक एक नवा आयोग नेमला गेला. हा आयोग म्हणजे नॉनप्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. रिपब्लिक व डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांकडून या आयोगाला वित्तपुरवठा होत असतो. वाद चर्चांचे आयोजन अमेरिकेच्या विद्यापीठात केले जाते. या चर्चेद्वारे दोन्ही उमेदवारांची धोरणे लोकांसमोर मांडली जातात. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक उत्सुकता होती ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची निवड होणार का याची.

अमेरिकन समाज अतिशय आधुनिक विचारांचा, लोकशाहीवादी, पुढारलेला आहे असे म्हटले जाते. मात्र, वस्तुस्थिती अशी की जगातील सर्वांत जुनी लोकशाही असणा-या या देशात आतापर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्ष झाली नाही. इतकेच काय तर अमेरिकेच्या संपूर्ण न्यायव्यवस्थेमध्ये फक्त चार महिला न्यायाधीश आहेत, त्या देखील बराक ओबामांच्या कारकीर्दीत नेमल्या गेल्या आहेत. म्हणजेच अमेरिकन संस्कृती ही पुराणमतवादी आणि पुरुषप्रधानच आहे. आजही ट्रम्प यांच्याकडून कमला हॅरिस यांच्याविषयी केली गेलेली वक्तव्ये अत्यंत मानहानीकारक होती. ट्रम्प यांनी गत निवडणुकीतही महिलांविषयी अश्लाघ्य टीका केली होती. एकंदरीत ट्रम्प यांची आक्रमक भूमिका आणि गत निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या समर्थकांनी घातलेला गोंधळ पाहता अमेरिकन मतदार त्यांना पुन्हा संधी देणार की कमला हॅरिस यांची निवड करणार याबाबत औत्सुक्य होते. अखेर ट्रम्प यांनीच बाजी मारली. आता अमेरिकेचे सुवर्णयुग सुरू झाले आहे. देशवासियांनी आमच्या पारड्यात भरभरून मते टाकली आहेत.

अमेरिकन जनतेचा हा भव्य विजय आहे. यापूर्वी कधीही अनुभवला नाही असा हा क्षण आहे. ही घटना सार्वकालिक मोठी राजकीय घडामोड आहे असे विजयानंतर ट्रम्प यांनी म्हटले आहे. आपल्याला अध्यक्षपदी विराजमान करून असामान्य बहुमान दिल्याबद्दल ट्रम्प यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. अमेरिका सामर्थ्यशाली, सुरक्षित आणि समृद्ध होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असा निर्धारही ट्रम्प यांनी व्यक्त केला. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यांत मुसंडी मारली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांची राजकीय समीकरणे बिघडवली. पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया ही महत्त्वाची मोक्याची राज्ये रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅटिक पक्षाकडून खेचून घेतली.

नॉर्थ कॅरोलिना या आणखी एका निर्णायक राज्यात ट्रम्प यांनी विजय मिळवला. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांच्याकडून २०२०च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने यंदाच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले होते. ट्रम्प यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याचे बोलले जात होते. प्रचारादरम्यान कमला हॅरिस यांनी मध्यमवर्गाला दिलासा देण्यावर भर दिला होता. कर सवलत देणे, परवडणारी घरे देणे, महिलांच्या गर्भपातावरील बंदी उठविण्याची आश्वासने कमला हॅरिस यांनी दिली होती. दुस-या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची घोषणा केली होती. विदेशी वस्तूंवर अधिक कर आकारणी, ऊर्जा निर्मितीमधील खर्च कमी करणे अशा प्रकारची आश्वासने दिली होती. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी ‘स्पेसएक्स’चे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांचा ‘नवा तारा’ असा उल्लेख केला आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले.

ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले तर ते जगात युद्ध घडवून आणतील अशी टीका डेमोक्रॅटिक पक्षातील त्यांच्या विरोधकांनी केली होती. त्यावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले, आपल्याला सुरक्षित सीमा हव्या आहेत. आपल्याला समर्थ लष्कर हवे आहे, पण आपल्याला ते कधीही वापरण्याची गरज पडणार नाही. मी युद्ध सुरू करणार नाही, युद्ध थांबवेन असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या विजयामुळे जागतिक पर्यावरणाच्या लढ्याला जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे. पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय कराराला कोणतेही महत्त्व न देण्याची त्यांची भूमिका आणि त्यासाठी निधी देण्यास नकार यामुळे पर्यावरणवादी कार्यकर्ते चिंतेत पडले आहेत. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ धोरणाचा भारतीय निर्यातदारांना फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहने, औषधे, कापड आदीवरील आयात शुल्कात ट्रम्प वाढ करतील असेही बोलले जात आहे.

‘अमेरिकेला पुन्हा महान बनवू या’ ही ट्रम्प यांची घोषणा असून त्यासाठी ते विविध वस्तू आणि सेवांवरील आयात शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या विजयाने चीन-अमेरिकेतील सुप्त संघर्ष वाढेल असा अंदाज आहे. ट्रम्प यांचे सत्तेत येणे चीनसाठी जगात आपले महत्त्व वाढवण्याची संधी ठरेल असेही मानले जात आहे. मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चीनविरोधात तैवानला बळ दिले होते, शस्त्रास्त्रे पुरवली होती. ट्रम्प तैवानला अशी मदत सुरू ठेवतील असे वाटत नाही. त्याचा फायदा चीनला होऊ शकतो. ट्रम्प यांच्या विजयाबद्दल असे म्हणावे लागेल की, जगातील पुरोगाम्यांचा आधारस्तंभ असणा-या अमेरिकेतच ‘पुरुषी अहं’ने महिलांवर मात केली!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR