मुंबई : प्रतिनिधी
कोकणात नगर परिषद निवडणुकीचे मैदान चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकीसाठी काल अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यामुळे अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता निडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यभरात काही ठिकाणी महायुतीमध्ये लढत होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोकणातही भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. सिंधुदुर्गमध्ये नगर परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा राणे विरुद्ध नाईक असा वाद पेटला असून वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्यावर आरोप करत थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
निलेश राणे यांना गरजेपेक्षा अतिरिक्त स्वरूपात दिलेली एस स्कॉर्ड पोलिस संरक्षण कमी करण्यात यावे, अशी मागणी देखील नाईक यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात केली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राणे विरुद्ध नाईक असा संघर्ष निर्माण झाला आहे. खरंतर स्थानिक निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी होऊन पक्ष स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे विविध कारणांमुळे राजकीय घमासान पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नाईकांनी निलेश राणेंवर केलेला आरोप येथील स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
वैभव नाईकांचा आरोप काय?
गरज नसतानाही निलेश राणेंना मोठ्या स्वरूपाचे पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता सुरू असून निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निलेश राणे हे वाय आणि एस स्कॉर्ड दर्जाच्या पोलिस संरक्षणाचा वापर बेकायदेशीररीत्या मतदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी करीत आहेत. पोलिस संरक्षणातून क्रेझ निर्माण करून मतदारांवर प्रभाव पाडत आहेत, असा थेट आरोपच वैभव नाईक यांनी केला आहे.
निलेश राणेंचा भाजप प्रदेशाध्यांवर गंभीर आरोप
दरम्यान, सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेनेने स्वबळाचा नारा देत स्वतंत्र निवडणुकाला सामोरे जाण्याचा मोठा निर्णय घेतला. शिवसेना आणि भाजपची युती न झाल्यास पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी थेट भाजपच्या प्रदेशाध्यांना लक्ष्य करत गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांची शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही होती. जो युतीचा प्रस्ताव असेल तो स्वीकारण्याची आमची तयारी होती. मात्र, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युती नको होती, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

