अहमदपूर : रविकांत क्षेत्रफाळे
तालुक्यातील मौजे चिलखा येथिल मन्याड नदीच्या आलेल्या महापुरामध्ये तीन मजुर असलेले व्यक्ती कामावर गेले होते. ते पुरात अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळाली असता घटनास्थळी तात्काळ अहमदपूर रेस्क्यू टीमच्या मदतीने रेस्क्यू करण्यास सुरुवात केली. या दरम्यान पोलीस मुख्यालय येथील रेस्क्यू टीम व त्यामधील पोलीस कॉन्स्टेबल रियाज देशमुख व गावातील नामदेव ज्ञानोबा माने रा. चिलखा यांनी मोलाची मदत करून या तालुक्यातील सर्वात मोठी नदी असलेल्या मन्याड नदीच्या महापुरात अडकलेल्या तीन मजुरांची सुखरूप सुटका केली. दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावांचा संर्पक तुटला होता तर बरेच वाहतूक मार्ग बंद झाले होते.
मौजे चिलखा येथिल मन्याड नदीच्या आलेल्या महापुरामध्ये तीन मजुर हे पहाटे पासून अडकल्याचे समजले. यातील अल्ली कौसर वय २३ वर्ष रा. बिहार, रामकिशन भुजंग कांबळे वय ४५ वर्ष रा. जांब-हिप्परगा, व नंदकुमार शंकरराव वळसे वय ५० वर्ष रा. मंगनाळ ता. कंधार जि. नांदेड यांना दुपारी एक वाजता बाहेर काढण्यात यश आले. अहमदपूर पोलीस मुख्यालय रेस्क्यू टीम व गावातील नागरिकांच्या सहकार्याने तीन मजुरांची पुरातून सुटका करण्यात यश आले. तर या तालुक्यात पुलावरून पाणी जात असल्यामुळे किनगाव ते अहमदपूर रस्ता बंद झाला होता. यानंतर माकणी ते चोबळी जाणारा रस्ता, कोळवाडी ते किनगाव जाणारा रस्ता, सिंदगी गावचा संपर्क तुटला होता. या सोबतच किनीकदू या गावचा ही संपर्क तुटला होता. मोघा ते अहमदपूर रस्ता, आंबेगाव ते शिरूर जाणारा रस्ता, अहमदपूर ते काळेगाव व खंडाळी हा रस्ता बंद होता.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पो. नि. बिरप्पा भूसनुर व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून मजुरांची सुटका केली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन उपस्थित परिस्थितीचा आढावा घेतला. पुरात अडकलेल्या व्यक्तींना भेट देऊन त्यांची विचारपूस केली. उपस्थित गावक-यांना, शेतकरी बांधवांना झालेल्या नुकसान भरपाई साठी शासन स्तरावरून मदत केली जाईल असे आश्वासन दिले.