सोलापूर-शहरातील बाळे परिसरातील शेतीच्या वादातून पुरुषोत्तम बन्ने यांच्या खूनप्रकरणातील आरोपी विजयकुमार आडके याचा जामीन अर्ज मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एस आझमी यांनी फेटाळला. विजयकुमार उर्फ बाळू शांतप्पा आडके (वय ३२, रा. पाटील गल्ली, देगाव, ता. उत्तर सोलापूर) असे जामीन अर्ज फेटाळलेल्याचे नाव आहे. पुरुषोत्तम उर्फ आप्पा दिगंबर बन्ने (वय ४५, रा. उत्तर कसबा, पत्रा तालीम जवळ, सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत जखमी देविदास दिगंबर बन्ने (वय ४२, रा. उत्तर कसबा, पत्रा तालीम जवळ, न सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन शांतप्पा आडके, सागर आडके, बाळू आडके (सर्व रा. देगाव, ता. उत्तर सोलापूर) आणि त्यांच्या ७ ते ८ साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळे येथील शेती गट नं. ४१/३ मध्ये शुक्रवारी शासकीय मोजणी करीत असताना शांतप्पा आडके, सागर आडके, बाळू आडके व त्यांच्या इतर साथीदारांनी ही शेती आमची आहे, मोजणी करायची नाही, नाही तर एकेकाला सोडणार नाही, या हरामखोरांना संपवू असे म्हणून हातातील लोखंडी पाईपने पुरुषोत्तम बन्ने यांना डोक्यात, दोनाही हातापायावर, कमरेवर व शरीराच्या इतर भागांवर जबर मारहाण करून त्यांचा खून केला.
तर देविदास बन्ने यांसदेखील लोखंडी पाईपने खांद्यावर, पायावर जबर मारहाण करण्यात येऊन जखमी करण्यात आले. याप्रकरणी देविदास बन्ने यांच्या फिर्यादीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आरोपी विजयकुमार आडके याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. याची सुनावणी मुख्य न्यायाधीश आझमी यांच्यासमोर झाली.
यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने वैदयकिय अधिकारी यांचा अहवाल, आरोपीकडून जप्त केलेले हत्यारे, नेत्र साक्षीदारांचे जबाब, फौजदारी प्रक्रिया संहितेचा १६४ प्रमाणे साक्षीदारांचे जबाब, निवेदन पंचनामे इतका भक्कम पुरावा सरकारकडे उपलब्ध असल्याचे सांगितले आणि तसेच आरोपी व मयत यांच्यातील पुर्व वैमनस्य व यातील आरोपींच्या नावे सोलापूर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेले गुन्हे हे ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
गुन्ह्याचा तपास पुर्ण झाला आहे, अशा परिस्थितीत अर्जदाराची जामिनावर सुटका झाली तर तो दूर पळून फरार होईल. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याने ते फिर्यादी साक्षीदारांवर दबाव आणतील, खटल्याच्या वेळी ते न्यायालयात हजर राहणार नाही, आरोपीवर यापुर्वी एक व त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारचे गुन्हे आरोपीकडून पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा युक्तीवाद सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आला. तो मान्य करीत न्यायालयाने आडके याचा जामीन अर्ज फेटाळला. याप्रकरणी सरकारच्यावतीने जिल्हा सरकारी वकिल अॅड. प्रदीपसिंह राजपूत यांनी तर आरोपींच्यावतीने अॅड. संतोष न्हावकर, अॅड. शहानवाज शेख, अॅड. राहूल रूपनर, अॅड. शैलेश पोटफोडे काम पाहात आहेत.