पुर्णा : सारथी व महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहूरी अंतर्गत स्थापित रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या लक्षित गटातील युवक व सदस्यांकरिता ड्रोन पायलट प्रशिक्षण सत्र अंतर्गत पुर्णा तालुक्यातील युवा शेतकरी निवृत्ती नवघरे, सतीश क-हाळे, प्रदीप मोरे हे प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण करुन ड्रोन पायलट बनले आहेत.
कृषीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणेकरिता केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहनात्मक अनुदान देत आहे. ड्रोनव्दारे विविध खरिप, रब्बी, फळपिके तसेच भाजीपाला पिकावर किटकनाशकाची फवारणी सुलभरित्या करता येते. मात्र योग्यरित्या ड्रोन चालवू (ऑपरेट करु) शकतील, असे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे. शेती क्षेत्रातील लक्षित गटातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ड्रोन पायलट प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रम अंतर्गत पुर्णा तालुक्यातील युवा शेतकरी निवृत्ती नवघरे, सतीश क-हाळे, प्रदीप मोरे हे ड्रोन पायलट प्रशिक्षण पुर्ण करुन रिमोट पायलट प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. एम. के. सी. एल. चे जिल्हा व्यवस्थापक सिद्धार्थ पाटील, किशोर आव्हाळे, स्वराज्य संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य साहेबराव कल्याणकर जिल्हाध्यक्ष सचिन अवरगंड, पूर्णा कृषी सेवा केंद्र व्यापारी प्रल्हाद नवघरे, नंदू शिंदे, सुमित कोत्तावार यांच्याबरोबर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.