मुंबई : प्रतिनिधी
महायुतीने मुंबईसाठी वचननामा जाहीर केल्यानंतर काँग्रेसने तोफ डागली आहे. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. मग त्यांनी २०१७ चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी. चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? हा आमचा प्रश्न असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून २०२६ साठीचा वचननामा जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध झाला. तब्बल दोन लाख मुंबईकरांनी दिलेल्या सूचना आणि अपेक्षांचा अभ्यास करून हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आला आहे. या वचननाम्यात मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून शहरात २० ते ३५ लाख नव्या घरांची निर्मिती करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
विशेषत: धारावी पुनर्विकास प्रकल्प डीआरपी अंतर्गत राबवला जाईल आणि धारावीतील रहिवाशांना ३५०चौरस फूटपर्यंतची घरे धारावीतच देण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मुंबईतील नागरिकांवर आर्थिक बोजा वाढू नये म्हणून पुढील पाच वर्षे पाणीपट्टी वाढवली जाणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णयही या वचननाम्यात जाहीर करण्यात आला आहे.
सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, गेले दोन महिने हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम केल्यानंतर प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी महायुतीने आपला जुमलानामा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. मग त्यांनी २०१७ चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी.
चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? हा आमचा प्रश्न आहे. यातील काही आश्वासने आम्ही आठवण करून देत आहोत. ११ लाख घरे, आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले? असा प्रश्नही सचिन सावंत यांनी केला.
मुख्यमंत्री जी तारीख देतात ती कधीच पूर्ण होत नाही
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री हे ‘सपनों के सौदागर’ म्हणजे स्वप्नांचे व्यापारी आहेत. त्यामुळे सोनेरी भविष्याचे रंग दाखवताना वर्तमान किती काळा आहे हे सांगत नाहीत. त्यांच्या सर्व मुलाखतीतून भविष्यातील संकल्पना सांगतात पण आतापर्यंतच्या आश्वासनांचे काय झाले हे सांगत नाहीत. ईस्टर्न फ्री वे २०१७ साली ठाण्याला जोडण्यात येणार होते.
पूरमुक्त मुंबई २०१७ साली आश्वासन होते, ते आश्वासन आजही आहे. मुख्यमंत्री जी तारीख देतात ती कधीच पूर्ण होत नाही. ‘तारीख पे तारीख’ हा डायलॉग मुख्यमंत्र्यांकडून घेतला असावा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर होणार यासाठी २०१९ पासून वेगवेगळ्या तारखा देत आले. अद्याप जवळपासही पोहोचलो नाही. बांगलादेशी-रोहिंग्या सर्वांत जास्त शोधून काढले असे मुख्यमंत्री म्हणतात मग आकडेवारी जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली.

