पूर्णा : शहरात रमजान ईद दि.३१ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरातील ईदगाह येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली. त्याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि पत्रकार यांनीही ईदगाह येथे हजेरी लावून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
नमाज पठणानंतर इमाम शमीम रिजवी यांनी देशाच्या एकता आणि शांततेसाठी विशेष दुवा केली. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली होती. तसेच नमाज पठणाच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती.
रमजान ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांनी पारंपरिक शिरखुर्मा आणि विविध गोड पदार्थ तयार करून आप्तस्वकीय व मित्रपरिवारासह त्याचा आनंद घेतला. ईदच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन स्नेहभाव आणि बंधुतेचा आनंद लुटला. ईद निमित्ताने लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. ईद निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.