36.8 C
Latur
Sunday, April 13, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपृथ्वीचे ध्रुव हवामान बदलामुळे सरकणार

पृथ्वीचे ध्रुव हवामान बदलामुळे सरकणार

झुरिच : वृत्तसंस्था
हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळल्याने येत्या काही वर्षांत पृथ्वीचे भौगोलिक ध्रुव हलण्याची शक्यता असल्याचे एका नव्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, बर्फाच्छादित प्रदेश वितळल्यामुळे आणि महासागरातील पाण्याचे प्रमाण जगभरात पुन्हा वितरित झाल्यामुळे, पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या स्थानात २१०० सालापर्यंत सुमारे ८९ फूट (२७ मीटर) पर्यंत बदल होऊ शकतो. पृथ्वीच्या फिरण्याच्या अक्षात होणा-­या या बदलामुळे उपग्रह व अंतराळ यानांच्या दिशादर्शक प्रणालींवर परिणाम होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

पृथ्वी फिरताना तिच्या वस्तुमानाच्या वितरणात होणा-या या बदलांमुळे ती आपल्या अक्षाभोवती गरगर फिरणा-या भांड्यासारखी डळमळते.

अलीकडील अभ्यासांनी सुचवले आहे की, बर्फ वितळल्यामुळे होणा-या वस्तुमान वितरणातील बदलामुळेही पृथ्वीचे ध्रुव हलू शकतात. ‘ईटीएच’ झुरिचमधील संशोधकांनी १९०० ते २०१८ या कालावधीतील ध्रुवांच्या हालचालींचा अभ्यास करून आणि भविष्यातील बर्फ वितळण्याचे विविध अनुमान लक्षात घेऊन, हवामान बदलाच्या विविध परिस्थितींनुसार ध्रुव किती हलू शकतील, याचा अंदाज व्यक्त केला आहे. या हालचालींमध्ये ग्रीनलँड आणि अंटार्क्टिक खंडातील बर्फ वितळण्याचा सर्वात मोठा वाटा असल्याचे आढळून आले, त्यानंतर हिमनद्यांच्या वितळण्याचा क्रम लागतो.

अभ्यासाचे सहलेखक आणि सध्या व्हिएन्ना विद्यापीठात कार्यरत असलेले पृथ्वीशास्त्रज्ञ मोस्तफा कियानी शाहवंदी यांनी सांगितले, ‘हा परिणाम हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमिनीच्या उचलाचा प्रभाव म्हणजे ‘ग्लेशियल आयसोस्टॅटिक ऍडजस्टमेंट’ यापेक्षाही अधिक ठरतो.’ त्यांच्या म्हणण्यानुसार, बर्फयुगाच्या वेळी जड हिमनद्या आणि बर्फाच्या थरामुळे जमिन खाली बसली होती आणि ते वितळल्यानंतर जमिनीने वर उठण्यास सुरुवात केली. त्यामुळे वस्तुमानाच्या वितरणात बदल झाला आणि ध्रुव हलले. ‘म्हणजेच, मानवनिर्मित हवामान बदलामुळे होणा-या ध्रुवांच्या हालचाली या नैसर्गिक हिमयुगातील बदलांपेक्षाही जास्त आहेत,’ असे कियानी शाहवंदी यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR